फडणवीस-अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
उदय जाधव, प्रतिनिधी मुंबई, 11 जुलै : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. काल रात्रीही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात आज पुन्हा एकदा तीनही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. आज दिवसभर महायुतीच्या तीनही पक्षांनी स्वत:च्या आमदारांसोबत चर्चा केली होती. आपआपल्या पक्षातील आमदारांचं म्हणणं आता तीनही नेते एकमेकांसमोर मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तीनही पक्षातील नेत्यांनी त्यांच्या आमदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा रात्री उशीरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून मंत्रिमंडळाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. अजितदादा अजूनही वेटिंगवर; मुश्रीफ आणि भुजबळांसह 8 जणांना मंत्रालयात मिळाले दालन! उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार? शिवसेना-भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी 2 जुलैला शपथ घेतली, पण अजूनही या मंत्र्यांचं खातेवाटप करण्यात आलेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना आमदारांकडून केली गेल्याचंही बोललं गेलं, यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. शिवसेना-भाजप यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या दुपारी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 5 आणि काही अपक्ष आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शिवसेना आणि भाजप मंत्र्यांकडची अधिकची खाती दिली जाणार आहेत, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची मंत्री संख्या कायम राहणार आहे, पण दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे.