नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : आजकालच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयातच मधुमेह (Diabetes) , रक्तदाब (Blood Pressure) , हृदयविकार (Heart Problem) असे विकार अनेकांना गाठत आहेत. मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधं घेतली जातात. तुम्हाला मधुमेहाची लक्षणं दिसत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. उपचारांसाठी प्रथम घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषधं वापरणं चांगलं होईल. विशेष म्हणजे यातली अनेक औषधं आपल्या घरातही सहज उपलब्ध होतात. त्यामुळे घरच्या घरी हे उपाय करून मधुमेह आटोक्यात ठेवता येतो. जागतिक मधुमेह दिनानिमित्त (World Diabetes Day 2021) पतंजलीचे (Patanjali) प्रमुख आचार्य बाळकृष्ण (Acharaya Balakrishna) यांनी मधुमेह बरा करण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती दिली आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रोजच्या आहारात काही भाज्यांचा समावेश करून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हातभार लावता येतो. कारलं, काकडी, टोमॅटो, सलगम, करवंद, भोपळा, पालक, मेथी, कोबी या भाज्या भरपूर खाव्यात. बटाटे आणि रताळी आहारातून वर्ज्य करावीत. फळांमध्ये सफरचंद, डाळिंब, संत्री, पपई, पेरू ही फळं खावीत आणि आंबा, केळी, लिची, द्राक्षं अशी फळं कमी खावीत. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, अक्रोड, अंजीर भरपूर प्रमाणात खावेत; मात्र बेदाणे, खजूर खाणं टाळावं. मधुमेहाच्या रुग्णांनी साखर, गूळ, उसाचा रस, चॉकलेट अजिबात खाऊ नये. एकाच वेळी जास्त अन्न खाऊ नये. भूक लागल्यावरही कमी प्रमाणात खावं. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज अर्धा तास चालणं आणि दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे. शक्य असल्यास योगासनं करावीत. दररोज प्राणायाम केला पाहिजे आणि तणावापासून शक्य तितकं दूर राहावं, असं आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं आहे. तुळशीतले (Basil) अँटिऑक्सिडंट्स (Anti Oxidents) आणि आवश्यक घटक शरीरात इन्सुलिन (Insulin) साठवून ठेवणाऱ्या आणि सोडणाऱ्या पेशींना योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज रिकाम्या पोटी तुळशीची 2 ते 3 पानं खावीत. यामुळे साखर किंवा मधुमेहाची लक्षणं कमी होतील. बडीशेपही (Fennel Seeds) मधुमेहामध्ये खूप फायदेशीर आहे. रोज बडीशेप खात असाल त्याचा फायदा होतो. कारल्याचा रसही साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करतो. दररोज कारल्याचा रस प्यावा. सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो, काकडी आणि कारल्याचा रस घेतल्यास फायदा होतो, असंही आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं आहे. हे ही वाचा- तुम्हालाही Social Media वर सतत निगेटिव्ह स्टोरी वाचण्याची सवय लागलीय का? मग वाचा हिवाळ्यात सहज मिळणारं सलगम सॅलड म्हणून घेतल्यास किंवा भाजी म्हणून खाल्लं तर मधुमेहावर गुणकारी ठरते. मेथीचे दाणे (Fenugreek) खाणंही गुणकारी असतं. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात मेथीचे दाणं घालावेत. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्यावं आणि मेथीचे दाणे चावून खावेत. याचं नियमित सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय मधुमेही रुग्णांनी रोज सकाळ-संध्याकाळ ताज्या गव्हाचा, ज्वारीचा अर्धा कप रस आपल्या आहारात घेतल्यास फायदा होईल. जांभळावर काळं मीठ घालून खाल्ल्यानेही रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते. रक्तातल्या साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी महिनाभर रोजच्या आहारात एक ग्रॅम दालचिनीचा वापर करा. ग्रीन टीमधलं पॉलिफेनॉल आणि त्यातले हायपोग्लायसेमिक घटक साखर कमी करण्यास मदत करतात. शरीर इन्सुलिनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास सक्षम होतं. कडुनिंबाच्या पानांचा रसही यावर लाभदायी ठरतो. आयुर्वेदानुसार हा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.