मुंबई, 27 फेब्रुवारी: मासिक पाळी (Periods) ही एक नैसर्गिक प्रकिया असून महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. सर्वसामान्यपणे वयाच्या 10 ते 15व्या वर्षी मासिक पाळी यायला सुरुवात होते. मासिक पाळीचे दिवस काही स्त्रियांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरते. कारण मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास (Periods Pain) ही अनेक महिलांसाठी एक गंभीर (Periods Health Issue) समस्या आहे. मासिक पाळीत कंबरदुखी, ओटीपोट दुखणं, छाती जड वाटणं, अस्वस्थता, सतत मूड बदलणं आणि चिडचिड होणं असे त्रास होतात. याशिवाय काही महिलांना पोटदुखीचा फार त्रास होतो. त्यामुळे अनेक जणी वेदनाशामक गोळी घेतात. त्याचे भविष्यात वाईट परिणाम होतात. त्यामुळे महिलांनी या काळात शक्य तितक्या कमी प्रमाणात पेनकिलर घ्यावी. पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला वेदनेपासून आराम मिळेल. पोटदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी पीरियड डाएट महत्त्वाचा आहे. पीरियड डाएटमध्ये मनुका, केशर आणि तूप यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. त्यांच्या मदतीने तुम्ही मासिक पाळीच्या वेदनांपासून काही प्रमाणात आराम मिळवू शकता. मनुका आणि केशरच्या सेवनाने वेदना कमी होतात. यासाठी एका वाटीत काळ्या मनुका (4 किंवा 5) आणि दुसऱ्यामध्ये केशर (1-2 काड्या) टाका. सकाळी उठल्यावर त्यांचं सेवन करा. त्यामुळे पीरियड क्रॅम्प्स आणि ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम पडू शकतो. तसंच बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि शरीरातली लोहाची कमतरता भरून काढण्यासदेखील याचा उपयोग होतो. हे वाचा- जुनी लिपस्टिक ओठांसाठी ठरेल अत्यंत धोकादायक! वाचा कशी तपासाल Expiry? गरम पाण्याच्या पिशवीत, हीटिंग पॅडमध्ये किंवा काचेच्या बाटलीत गरम पाणी भरा. ओटीपोटावर त्याचा थोडा शेक द्या. ओटीपोट शेकवल्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. कारण यामुळे ओटीपोटातल्या स्नायूंना आराम मिळतो. पोटदुखीवर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं. पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहतं. याशिवाय चहा किंवा कॉफी घेणंदेखील फायदेशीर आहे. मासिक पाळीत वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी मेथी दाणेदेखील फायदेशीर ठरतात. 12 तास मेथी पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर मेथी गाळून त्याचं पाणी प्यावं. यामुळे आराम मिळतो. तसंच आपल्या आहारात केळी, हिरव्या पालेभाज्या आणि पालकचा समावेश करावा. या पदार्थांमध्ये भरपूर जीवनसत्त्वं असतात. या गोष्टी लोहाचे मुख्य स्रोत आहेत. हे वाचा- कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं तेव्हा अशी लक्षणं दिसतात; त्याकडे दुर्लक्ष घातक ठरेल मासिक पाळीत पोटदुखी आणि इतर समस्यांमुळे खूप अस्वस्थ वाटत असेल, तर हिंग खावं. मासिक पाळीच्या दिवसात नव्हे, तर महिनाभर हिंग आहारात ठेवावं. ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. हिंग खाल्ल्याने ओटीपोटाचे स्नायू बळकट होतात आणि त्यांची लवचिकता वाढते. यामुळे मासिक पाळीत वेदना कमी होतात. मासिक पाळीच्या काळात महिलांना अॅसिडिटी, अपचन, पाठदुखी, मांडीदुखी, डोकेदुखी, छाती जड होणं, अशक्तपणा अशा अनेक समस्यांना सामोरं जावे लागते. काही स्त्रियांना तीव्र वेदना होतात. त्याचा त्यांच्या दैनंदिन कामावर परिणाम होतो. तसंच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यास अशक्तपणा येतो. मासिक पाळीच्या वेळी अधिक रक्तस्राव होत असेल, तर तुम्हाला अॅनिमिया असू शकतो. रक्तात पुरेशा निरोगी लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिन नसेल अॅनिमिया होतो. अॅनिमियावर उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.