कलियुगातील श्रावण बाळ! लाखोंची नोकरी सोडली, वडिलांच्या निधनानंतर स्कूटरने आईला करवतोय भारत दौरा
अयोध्या, 21 मे : त्रेतायुगातील श्रावणबाळाची कथा तुम्ही ऐकलीच असेल. पण कलियुगातही असे काही श्रावण बाळ आहेत, जे आपल्या आईवडिलांचा योग्य सांभाळ करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात. आज आम्ही तुम्हाला कलियुगातील अश्या श्रावणबाळाबद्दल सांगणार आहोत, ज्याने वडिलांनी दिलेल्या स्कुटरवर 75 वर्षीय आईसोबत केवळ भारतातच नाही तर परदेशातही धार्मिक यात्रा केली आहे. आम्ही बोलत आहोत कर्नाटकच्या डी कृष्ण कुमार यांच्याबद्दल. 48 वर्षीय कृष्ण कुमार हे मूळचे कर्नाटकचे असून त्यांच्या वडिलांचे 8 वर्षांपूर्वी निधन झाले. वडील असताना कुटुंबात तब्बल 10 जण होती आणि कृष्ण कुमार यांच्या आईच संपूर्ण जीवन कुटुंबातील मुलांचे पालनपोषण करण्यातच निघून गेलं. कृष्ण कुमार हे कॉर्पोरट कंपनीमध्ये टीम लीडर म्हणून काम करत होते. एके दिवशी घरी आईसोबत गप्पा मारत असताना त्यांनी आईला विचारले, “आई तू कधी कुठे फिरायला गेली आहेस का?. तेव्हा आई त्यांना म्हणाली की, “मी कधी शेजारचे मंदिर देखील पहिले नाही”. आईचे हे उत्तर ऐकून त्यादिवशी कृष्ण कुमार भावूक झाले, आणि त्यांनी आईला भारतातील सर्व तीर्थक्षेत्र दाखवून आणण्याचा संकल्प केला”.
14 जानेवारी 2018 रोजी कृष्ण कुमार यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पुढच्या दोन दिवसांनी ते वडिलांची स्कुटर घेऊन आई सोबत निघाले. नेपाळ, भूतान, म्यानमारसह संपूर्ण भारतात सुमारे 68,000 किलोमीटरचा प्रवास स्कूटरवरून करून ते काही दिवसांपूर्वी अयोध्येला आले. यावेळी त्यांनी आईसोबत अयोध्येतील मठ मंदिरांमध्ये पूजा केली. वडिलांनी दिलेल्या स्कुटरने आम्ही भारत दर्शन करत आल्याने आम्हाला आमचे वडील देखील आमच्या सोबत असल्यासारखे वाटते. मी खूप भाग्यवान आई… कृष्ण कुमार यांची आई चुडा रत्ना यांनी सांगितले की, पती हयात असताना त्यांच्याकाळात मला कधी कुठे जाण्याची संधी मिळाली नाही. परंतु माझ्या मुलामुळे मी संपूर्ण भारत पाहू शकतेय. भारतातील विविध धार्मिक स्थळी जाऊन मी तेथील देवतांचे दर्शन घेत शकते हे माझ्यासाठी खरोखरच भाग्याच आहे. आजकालच्या जगात जिथे मुलं आपल्या आई वडिलांना विचारात नाही, अशावेळी मला कृष्ण कुमारसारखा मुलगा असल्याने मी स्वतःला खूप नशीबवान समजते.