रोज किती चमचे मीठ खाण आरोग्यासाठी फायदेशीर? जास्त सेवन केल्याने होते नुकसान
मीठ हा आपल्या खाण्यापिण्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. मीठ अन्नाची चव वाढवत असल्याने ते बहुतेक पदार्थांमध्ये वापरले जाते तसेच मीठ हा शरीरासाठी देखील आवश्यक घटक आहे.परंतु मीठ कितीही चांगले असले तरी त्याचे सेवन प्रमाणाबाहेर झाल्यास त्याचे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगातील बहुतेक लोक दररोज 9 ते 12 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ वापरतात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. असे म्हणतात की, मिठाचा वापर कमी केला तर जगात दरवर्षी अडीच लाख मृत्यू टाळता येतील. तेव्हा दररोजच्या खाण्यापिण्यात किती मिठाचे सेवन केले पाहिजे हे तज्ञांकडून जाणून घेऊयात. नवी दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालक डॉ. सोनिया रावत यांच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रौढ व्यक्तींनी 5 ग्रॅमपेक्षा कमी म्हणजेच दररोज 1 चमचा मिठाचे सेवन योग्य आहे. 15 वर्षाखालील मुलांनी प्रौढ व्यक्तींपेक्षा कमी मीठ खावे. जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. मिठाच्या अतिसेवनाने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत लोकांनी मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
अनेकदा जंक फूड आणि स्नॅक्समध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे. तसेच जेवणात देखील मीठ कमी घालावे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आठवड्यातून एकदा मीठ न टाकता अन्नाचे सेवन करावे. असे केल्याने शरीराला अति मीठ खाल्याने होणाऱ्या समस्या टाळता येतील. विशेषत: ज्यांना उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागतो, त्यांनी मीठ प्रमाणातच खावे. एक कप कोथिंबीरचा चहा आणि…, उष्माघातामुळे होणाऱ्या लूज मोशन पासून मिळेल आराम डॉक्टरांच्या मते, रक्तदाब वाढण्यासोबतच जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी टिकून राहण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे तुमच्या हातपायांवर सूज येऊ शकते. जास्त मीठ खाल्ल्याने वारंवार तहान लागते. अति मीठामुळे अनेक प्रकारचे कर्करोग आणि हृदयविकारासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. मिठाचे अतिसेवन अनेक आजारांशी निगडीत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मीठ कमी खावे आणि स्वत:ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच जास्त मीठ शरीरासाठी घातक ठरू शकते.