व्हायरल
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : एखाद्या दिवशी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला जाणवलं की, एका डोळ्यानं दिसत नाही किंवा तुमचा इतर कुठला अवयव नाहीसा झाला आहे, तर? असं होण्याची कल्पनादेखील तुम्ही कधी केली नसेल! मात्र अमेरिकेतल्या 21 वर्षांच्या एका मुलाबाबत तसं झालं आहे. माइक क्रूमहोल्ज असं या मुलाचं नाव आहे. दिवसभराच्या थकव्यानंतर माइक गाढ झोपी गेला होता. जेव्हा तो झोपला तेव्हा त्याचे डोळे पूर्णपणे ठीक होते; पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती. एका पॅरासाइटने (परजीवी) झोपेत माइकचा डोळा खाल्ला आणि निमित्त ठरलं कॉन्टॅक्ट लेन्स. माइक रात्री कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपला होता. ‘एबीपी’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. माइक क्रुमहोल्ज अमेरिकेत फ्लोरिडामध्ये राहतो. ही घटना घडली त्या दिवशी सकाळी माइक उठला तेव्हा त्याचा एक डोळा दुखत होता. नेत्ररोगतज्ज्ञांना दाखवलं असता, त्याच्या डोळ्यात अत्यंत दुर्मीळ पॅरासाइट आढळला. डॉक्टरांच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. म्हणून त्याने अनेक डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. कॉर्निया तज्ज्ञांनाही तो भेटला. जेव्हा सात डॉक्टरांनी एकसारखंच निदान केलं, तेव्हा त्याचा विश्वास बसला की, एका पॅरासाइटने त्याचा डोळा खाल्ला आहे. हेही वाचा - चालत्या रुग्णवाहिकेला लागली आग… भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या डोळ्यात अकॅन्थामिबा केराटायटिस (Acanthamoeba Keratitis) नावाचा पॅरासाइट विकसित झाला होता. तो एक मांसाहारी जीव आहे. या पॅरासाइटने झोपलेल्या माइकचा उजवा डोळा खाल्ला. त्यामुळे माइकच्या उजव्या डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली आहे. अकॅन्थामिबा हा निसर्गात, विशेषत: ओल्या जागी आढळणारा एक अतिशय सूक्ष्म अमीबा आहे. त्याचा संसर्ग डोळ्यांतल्या कॉर्नियाला झाल्यास व्यक्तीची दृष्टी पूर्णपणे जाते. मिळालेल्या माहितीनुसार, माइक गेल्या सात वर्षांपासून कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करत आहे. त्यामुळे त्याला माहिती होतं, की लेन्सेस लावून झोपू नये; मात्र कधी-कधी तो लेन्स काढायचा विसरतो आणि तसाच झोपतो. यापूर्वी जेव्हा तो लेन्स लावून झोपला होता, तेव्हा त्याला डोळ्यात खाज सुटणं, डोळा लाल होणं किंवा काही प्रमाणात संसर्ग यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे; पण या वेळी तर संपूर्ण डोळाच गमावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
आपली दृष्टी गेल्याच्या घटनेवर विश्वास ठेवणं माइकला फार कठीण गेलं; मात्र आता त्यानं सत्य स्वीकारलं असून तो त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना माहिती देत आहे. त्याच्या मते ही ही एक जनजागृती मोहीम आहे, जेणेकरून कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्या इतर कोणाच्याही बाबतीत असं होऊ नये.