रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 2 मार्च: उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. यातच गावात थंड पेयाचे स्टॉल दिसून येत आहेत. अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यूस, उसाचा रस, यासह आवर्जून बर्फ गोळा देखील खाल्ला जातो. उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक पसंती बर्फ गोळ्याला असते. बीडमध्ये देखील बर्फ गोळ्याचा एक अनोखा स्टॉल असून तो वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. दहा वर्षांपासून विकतो बर्फ गोळा बीड शहरातील माळीवेस परिसरामध्ये मागील दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून साई बर्फ गोळा प्रसिद्ध आहे. आकाश काटकर नावाचा तरुण हा बर्फ गोळ्याचा व्यवसाय करतो. आपण अनेक ठिकाणी बर्फ गोळ्याचे स्टॉल पाहिले असतील. पण या ठिकाणी मिळणाऱ्या बर्फ गोळ्याला वेगळी चव तर आहेच. सोबत बर्फ गोळा खाता खाता तुम्हाला छान आणि सुरेख आवाजाची गाणी देखील कानावर पडतात.
आकाश ऑर्केस्ट्रात गातो गाणी आकाश हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बर्फ विक्रीचा व्यवसाय करतो. तर बाकी उरलेल्या महिन्यांमध्ये ऑर्केस्ट्रा मध्ये गाणे गाण्याचे काम करतो. तर याचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा देखील आहे. छंद आणि आवड असली तर माणूस वेगवेगळ्या कला आत्मसात करतो. त्यामुळेच बर्फ गोळा बनवताना या ठिकाणी आकाश हा गाणे म्हणतो आणि ते गाणे ग्राहकांना आकर्षित देखील करते. Video : पुण्यातील 108 वर्ष जुने आईस्क्रीम पार्लर माहिती आहे? ‘मस्तानी’साठी विशेष फेमस बर्फ गोळ्याचे 40 फ्लेवर उपलब्ध आकाशच्या गाड्यावर बर्फ गोळ्याचे 40 प्रकारचे फ्लेवर आहेत. तर दहा रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत या ठिकाणी बर्फ गोळे उपलब्ध आहेत. खवा गुलकंद, मावा ड्रायफूट, स्पेशल पान, मलाई, ड्रायफ्रूट अशा प्रकारचे विविध बर्फ गोळे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे या बर्फ गोळ्याच्या स्टॉलवर खवय्ये मोठी गर्दी करत असतात.