दूध न घातलेल्या मिठाई : जर तुम्हाला मिठाई खाण्याची आवड असेल तर अशा मिठाई प्रवासात सोबत ठेवावी ज्यामध्ये दूध आणि दुधाचा वापर केला नसेल. यासाठी तुम्ही घरी बनवलेले पीठ किंवा ड्रायफ्रूट लाडू, गजक, तिळाचे लाडू किंवा चिक्की यासारख्या गोष्टी घेऊ शकता.
मुंबई, 3 नोव्हेंबर- देशभरात दिवाळीनिमित्तानं (Diwali) उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे. वर्षातील महत्त्वाचा सण असलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. दिवाळीसाठी कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. वर्षातील महत्त्वाच्या आणि शुभ गोष्टींचा प्रारंभ दिवाळीच्या काळात केला जातो. दिवाळी ही खवय्यांसाठी देखील पर्वणी असते. या काळात घरोघरी लाडू, चकली, चिवडा आदी फराळाचे पदार्थ तयार केले जातात. अलीकडच्या काळात या पदार्थांसोबतच मिठाई, चॉकलेट खरेदीलाही प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे या काळात मिठाईची (Sweet meat) विक्रीही वाढते. सध्या विविध प्रकारचे पेढे, बर्फी तसेच अन्य पदार्थांनी मिठाईची दुकानं सजलेली दिसत आहेत. मात्र मिठाईला वाढती मागणी असल्यानं बऱ्याचदा ती तयार करण्यासाठी बनावट खव्याचा (Khava) वापर केला जातो. तुम्ही खरेदी केलेली मिठाई ही चांगल्या खव्यापासून तयार केली आहे की बनावट खव्यापासून हे ओळखता येणं आवश्यक आहे. खव्याची पारख करण्यासाठी काही विशिष्ट पध्दतींचा वापर केला जातो. याबाबतची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे. अलिकडच्या काळात दिवाळी आणि मिठाई असं समीकरण पाहायला मिळत आहे. आप्तेष्ट, मित्रमंडळींना भेटवस्तूंसोबत मिठाई देण्याची प्रथा आहे. त्यामुळे या काळात मिठाईला मोठी मागणी असते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा काही मिठाई व्यापारी घेण्याचा प्रयत्न करतात. असे व्यापारी मिठाई तयार करण्यासाठी बनावट खव्याचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा खवा आरोग्यासाठी अपायकारक असल्यानं मिठाई खरेदी करताना तिचा दर्जा आणि प्रामुख्यानं खवा तपासण्यासाठी काही प्राथमिक गोष्टींची माहिती आवश्यक असते. काही व्यापारी मिठाई तयार करण्यासाठी सिथेंटीक खव्याचा (Synthetic Khava) वापर करतात. त्यामुळे तुम्ही दुकानातून मिठाई खरेदी करत असाल किंवा घरी मिठाई तयार करण्यासाठी खवा खरेदी करत असाल तर विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बनावट मावा (Mawa) किंवा खवा तयार करण्यासाठी स्टार्च, आयोडीन, शिंगाड्याचं पीठ आणि बटाटयाचा वापर केला जातो. या घटकांमुळे खव्याचं वजन वाढतं. बनावट खवा हा शुध्द खव्यासारखा दिसावा यासाठी त्यात काही केमिकल्स मिसळली जातात. काही दुकानदार मिल्क पावडरमध्ये वनस्पती तूप मिक्स करून खवा बनवतात. सणासुदीपूर्वी सिथेंटिक दूधाची विक्री वाढते. सिंथेटिक दूध तयार करण्यासाठी त्यात सर्वप्रथम युरिया (Urea) टाकून ते उकळवलं जातं. त्यानंतर त्यात कपडे धुण्यासाठी वापरलं जाणारं डिटर्जेंट, सोडा, स्टार्च आणि फॉरमॅलिन मिक्स केलं जातं. त्यानंतर असं दूध उकळवलं जातं. बनावट खवा किंवा सिथेंटिक दूधापासून तयार केलेली मिठाई सेवन केल्यास फूड पॉयझनिंग, उलटया, जुलाब आदी आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे त्याचा किडनीवरही (Kidney) वाईट परिणाम होतो. अशी मिठाई अधिक प्रमाणात खाल्ल्यास लिव्हरवर परिणाम होण्याची शक्यता असते. काही कालावधीनंतर कॅन्सर देखील होऊ शकतो. (हे वाचा: तुम्हालाही नाश्त्यासोबत चहा पिण्याची सवय आहे का? आरोग्य तज्ज्ञांनी दिला हा इशारा ) तुम्ही खरेदी केलेला खवा बनावट आहे की शुध्द हे ओळखण्यासाठी काही सोप्या पध्दती आहेत. खव्यात थोडीशी साखर (Sugar) टाकून तो गरम करावा. जर त्याला पाणी सुटलं तर तो बनावट आहे हे ओळखावं. तसेच थोडासा खवा हातावर घेऊन तो रगडावा. जर खवा शुध्द असेल तर त्याला शुध्द देशी तुपाचा (Desi Ghee) वास येईल आणि जर बनावट असेल तर त्याला विचित्र दुर्गंधी येईल. शुध्द खवा खाल्ल्यास तो चिकट लागत नाही. बनावट खवा तोंडात चिटकून बसतो. शुध्द खव्याची चव कच्च्या दुधाप्रमाणे लागते. बनावट खव्यात पाणी टाकलं तर त्याचे छोटे तुकडे होतात. शुध्द खव्यात पाणी टाकल्यास तो पातळ होऊन विरघळून जातो. जर थोडासा खवा तुम्ही खाऊन पाहिला आणि तो दाणेदार लागला तर तो बनावट असतो.