गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खोके हा शब्द कळीचा झाला आहे.
मुंबई, 27 नोव्हेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेतील काही आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर एक शब्द वारंवार तुमच्याही कानावर पडत असेल. तो म्हणजे ‘खोके’. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी 50 खोके घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे गट करत आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. मात्र, हा खोके शब्द आला कुठून हे तुम्हाला माहीत आहे का? हा काही राजकारणात निर्माण झालेला शब्द नाही. विशेष म्हणजे शब्दकोशातही तुम्हाला याचा मूळ अर्थ मिळणार नाही. कारण, या शब्दाची निर्मितीच मुळी अंडरवर्ल्डमध्ये झालेली पाहायला मिळते. रोजच्या राजकारणाच्या कंटाळवाण्या बातम्यातून आज जरा मनोरंजक माहिती घेऊ. भारतातील अंडरवर्ल्ड संस्कृतीतून काही शब्द निर्माण झाले जे चित्रपटांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले. खोका, पेटी, घोडा, सुपारी… हे शब्द अंडरवर्ल्डच्या माध्यमातून लोकांसमोर आले. अशा सांकेतिक शब्दांचे अर्थ काय आहेत ते जाणून घेऊ. सुपारी, खोका, घोडा… त्यांचा अर्थ काय? हिंदी चित्रपटांमध्ये गुंडाच्या तोंडी हे शब्द तुम्ही अनेकदा ऐकले असतील. ‘पेटी’ म्हणजे 1 लाख रुपये आणि ‘खोका’ म्हणजे 1 कोटी रुपये. मुंबईतील माफिया वर्तुळात ‘सुपारी’ म्हणजे कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि ‘लंबी’ म्हणजे AK-47. ‘घोडा’ म्हणाल तर पिस्तुल. ‘देसी घोडा’ म्हणजे भारतीय पिस्तूल आणि ‘विदेशी घोडा’ म्हणजे आयात केलेले पिस्तूल. वाचा - कंटेनर भरून खोके कुणी पचवले, एकदिवस…, एकनाथ शिदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली तेव्हा अंडरवर्ल्डमध्येही अनेक क्रिकेट संज्ञा वापरल्या जाऊ लागल्या. उदाहरणार्थ, खुनासाठी ‘सिक्सर’ आणि एरियल फायरसाठी ‘फोर’, 500 रुपयांच्या नोटेसाठी ‘इलायची’, लहान बॉम्बसाठी ‘लाडू’, टाइम बॉम्बसाठी ‘वॉच’. कालांतराने ‘खोका’ आणि ‘पेटी’ शब्दही रिप्लेस झाले. काही गुन्हेगार त्याऐवजी ‘हात’ आणि ‘कान’ वापरतात. खुनासाठी ‘टपका देने’चा वापर केला जातो.
डॉन, माफियांसाठीही कोड-वर्ड एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केवळ कोड-वर्डच नाहीत तर डॉन आणि माफियांनाही विशेष नावांनी हाक मारली जाते. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला त्याचे जवळचे मित्र ‘मुच्छड’, ‘बडे’ म्हणतात. बडा राजनच्या मृत्यूनंतर दाऊदने राजेंद्र सदाशिव निकाळजे याला ‘छोटा राजन’ म्हणायला सुरुवात केली. दाऊदच्या टोळीत ‘लंबा शकील’ नावाचा गुंड होता. छोटा राजन टोळीतून बाहेर पडल्यानंतर छोटा शकीलची एन्ट्री झाली. फहीम ‘मचमच’ हे नाव पडले कारण तो खंडणी मागताना खूप त्रास देत असे. ताहिर मर्चंटला टक्कल असल्यामुळे त्याला ‘ताहिर टकलाया’ म्हणत. गँगस्टर अरुण गवळीला गुन्हेगारीच्या जगात ‘डॅडी’ म्हटले जायचे.