मुंबई 17 मार्च: बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची चलती आहे. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री यांचीच मुलं किवा नातेवाईक सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. खरं तर सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीपासूनच या सेलिब्रिटी किड्सकडे मोठी फॅन फॉलोइंग असते. त्यामुळं एखाद्या सुपरस्टारप्रमाणं धुमधडाक्यात त्यांची बॉलिवूडमध्ये एंट्री होते. मात्र बॉलिवूडमध्ये घराणेशाहीची परंपरा असतानाही अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता या चंदेरी दुनियापासून दूर का राहिली? (Shweta Bachchan Nanda) आज तिचा 47 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं जाणून घेऊ तिचं सिनेसृष्टीमधून काढता पाय घेण्यामागचं खरं कारण… श्वेता बच्चन नंदाचा जन्म भारतात झाला होता. परंतु, नंतर ती उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेली. तिथं बरीच वर्ष घालवल्यानंतर श्वेतानं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. देशात परतल्यावर तिनं एका वृत्तवाहिनीसाठी पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पत्रकार म्हणून वावरताना तिला सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती मिळू लागली. शिवाय सर्वसामान्य लोक त्यांच्याबद्दल कसे विचार करतात याबद्दलही तिला अनोखे अनुभव आले. परिणामी प्रसिद्ध होण्याची हौस हळहळू कमी झाली. शांतपणे स्वत:चं काम करावं. अन् चेहऱ्याऐवजी कामातून प्रसिद्धी मिळवावी ही इच्छा तिच्या मनात निर्माण झाली त्यामुळं तिनं बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अवश्य पाहा - ‘त्याच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय’; कोरोनासंक्रमित मनोज वाजपेयी संतापला
श्वेताने एका मुलाखतीत सांगितले होतं की लहानपणी तिला अभिनय करणं हे खूप सोपं वाटायचं, नुसते डायलॉग्स पाठ करायचे अन् कॅमेरासमोर बोलायचं. पण एकदा शाळेत नाटकात काम करत असताना तिनं भरपूर तयारी केली होती. पण स्टेजवर पोहोचताच ती डायलॉग्स विसरली. सर्वांसमोर तिचं हसं झालं. अमिताभ बच्चन यांची मुलगी असतानाही तिला दोन वाक्य लक्षात राहात नाही असं म्हणून मैत्रीणी तिला चिडवू लागली. या घटनेमुळं सिनेसृष्टीबाबत तिच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळं तिनं कॅमेऱ्यामोर जाण्याऐवजी लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा मार्ग स्विकारला.