कोणे एके काळी हॉलिवूडमधलं सुपरकपल (SuperCouple) असलेल्या अँजेलिना जोली (Angelina Jolie) आणि ब्रॅड पिट (Brad Pitt) यांच्यामधले वाद आता विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. आता तर आपल्याकडे ब्रॅडविरोधात कौटुंबिक हिंसाचाराबद्दलचे पुरावे असल्याचा दावा अँजेलिनाने केला असून, ते पुरावे तिच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आले आहेत. 45 वर्षांच्या अँजेलिनाने तिचा पूर्वीचा पती ब्रॅड पिट (57) याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहेत. तसंच ते आरोप सिद्ध करण्यासाठी तिने कोर्टात पुरावे सादर केले आहेत. तसंच आपण आणि आपली मुलं कोर्टात साक्ष द्यायलाही तयार आहोत, असं अँजेलिनाच्या वतीने सांगण्यात आल्याचं अमेरिकेतल्या एका साप्ताहिकात आलेल्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेतल्या कौटुंबिक कायदेविषयक तज्ज्ञाने त्या साप्ताहिकाला दिलेल्या माहितीनुसार, अँजेलिनावर किंवा तिच्या मुलांवर झालेला कौटुंबिक हिंसाचार (Domestic Abuse) सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे आणखी काही कागदपत्रं असतील, तर ती कागदपत्रं ती सादर करू शकते. आधीच्या कागदपत्रांव्यतिरिक्त ही आणखी कागदपत्रं असल्याचं ती सांगू शकते. म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचे अधिक ताजे पुरावे असल्याचा अर्थ त्यातून निघू शकतो. हे ही वाचा- ‘वयाच्या 15 व्या वर्षी झाला होता बलात्कार’; प्रियांकाच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट 2005 ते 2016 या काळात एकत्र होते. दोघंही हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते आहेत. अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्या दोघांच्या नावाचा संयोग करून दोघांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी ‘ब्रँजेलिना’ (Brangelina) असा शब्दप्रयोग वापरला जात होता. या दाम्पत्याला सहा मुलं असून, त्यापैकी तीन मुलं अँजेलिनाने वेगवेगळ्या देशांतून दत्तक घेतलेली आहेत. ब्रँजेलिनाला 2006मध्ये पहिली मुलगी झाली. तिचं नाव शिलोह (Shiloh). 2008मध्ये एक मुलगा-एक मुलगी अशी जुळी मुलं त्यांना झाली. त्यांची नावं अनुक्रमे नॉक्स (Knox) आणि व्हिव्हियन (Viviene). मॅडॉक्स (19), पॅक्स (17), झाहरा (16) या तीन दत्तक मुलांसह त्यांची स्वतःची तीन मुलंही घटस्फोटाच्या खटल्यात कोर्टात सुनावणीवेळी आपलं म्हणणं मुक्तपणे मांडू शकतात, असं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, ब्रॅडच्या जवळच्या एका खास व्यक्तीने संबंधित साप्ताहिकाला दिलेल्या माहितीनुसार, अँजेलिनाने पुरावे सादर करण्याचं कृत्य केवळ ब्रॅडला दुखावण्याच्या हेतूने केलं आहे. ‘साडेचार वर्षांहून अधिक काळात अँजेलिनाकडून अनेक दावे करण्यात आले आणि ते पुढे जाऊ शकले नाहीत. तिच्याकडून मुलांचा वापर केवळ ब्रॅडला दुखावण्यासाठी केला जातोय. तिच्या चौथ्या किंवा पाचव्या फळीतल्या वकिलांकडून कागदपत्रं सादर केली जाण्याचा दुसरा काही उद्देश नाही,’ असं त्या सूत्राने सांगितलं.