मुंबई, 20 एप्रिल: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक घटना आज घडली आहे. ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर (Kishore Nandalskar) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण (Coronavirus) झाल्यानंतर त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान 20 एप्रिल रोजी साधारण दुपारी साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती. दम लागणे, छातीत धडधडणे अशा आरोग्यविषयक समस्यांमुळे निर्माण झाल्या होत्या. वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांची बायपास करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच नांदलस्कर यांना कोरोनाची लागण झाली होती. आज मराठी चित्रपटसृष्टीत आपलं स्वत:चं अढळ स्थान असणारा तारा निखळला आहे. किशोर नांदलस्कर यांनी केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नवे तर बॉलिवूड चित्रपट, 40 नाटकं, 20 हून अधिक मालिका गाजवल्या होत्या. त्यांनी 30 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांची छोटीशी भूमिका प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद देऊन जायची. त्यांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. एक विनोदी अभिनेता म्हणून ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील. बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी विशेष नाव कमावलं. ‘वास्तव’मधील दीडफुट्याच्या वडिलांच्या भूमिकेने त्यांना विशेष प्रसिद्धी दिली. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होतं. पुरुषोत्तम बेर्डे यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचं दिग्दर्शन करत त्यांनी हे नाटक नव्याने सादर केलं, यात किशोर यांनी साकारलेली ‘राजा’ची भूमिका विशेष स्मरणात राहील. याशिवाया ‘वासूची सासू’, ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’, ‘श्रीमान श्रीमती’ या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.