मुंबई, 12 एप्रिल: मनोज बाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्याचा पहिला सीझन 2019 मध्ये रिलीज झाला होता, तेव्हापासून प्रेक्षक ‘द फॅमिली मॅन’ च्या (The Family Man-2) दुसर्या भागाची वाट पाहत होते. आता लवकरत दर्शकांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण मे महिन्यात ही वेबसीरिज रिलीज (Release date) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ ची रिलीजची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात द फॅमिली मॅनचा दुसरा भाग प्रदर्शित होण्याचे संकेत निर्मात्यांकडून देण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जानेवारी प्रदर्शित झालेली सैफ अली खानची वेबसीरिज ‘तांडव’ वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर ‘द फॅमिली मॅन 2’ च्या निर्मात्यांनी या वेबसीरिजचं प्रदर्शन थांबवलं होतं. अन्यथा ही वेबसीरिज फेब्रुवारी महिन्यातच प्रदर्शित होणार होती. तेव्हा वेबसीरिजच्या क्लायमॅक्सचं शूटिंग बाकी होतं. पण आता या मालिकेचं शूटींगही पूर्ण झालं असल्याची माहिती समोर आली आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, वेबसीरिज प्रदर्शित करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे ही वेबसीरिज एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होऊ शकते. आतापर्यंत या वेब सीरीजचा ट्रेलर आणि टीझर प्रसिद्ध झालेला नाही. यापूर्वी मालिकेच्या छोट्या छोट्या क्लिप प्रदर्शित करण्यात आल्या होत्या, परंतु मोठा धमाका अद्याप बाकी आहे. गेल्या काही काळापासून चाहते या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या ताज्या घडामोडीनंतर त्यांची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. हे ही वाचा- VIDEO : 2020 मध्ये सर्वाधिक गाजलेल्या 10 Web Series, बघा तुम्ही यातल्या कुठल्या पाहिल्यात? 20 सप्टेंबर 2019 रोजी या वेब सीरीजचा पहिला भाग आला होता. मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत होते. ज्यांनी देशाच्या सीक्रेट एजन्सीत काम केलं आहे. ही मालिका लोकांना प्रचंड आवडली होती आणि म्हणूनच दुसऱ्या सीझनबाबतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पण प्रदर्शनाची नेमक्या तारखेची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी ही वेब सीरीज मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.