मुंबई 5 फेब्रुवारी : अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) पवित्र रिश्ता (Pavitra Rishta)या मालिकेतून खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली. 2009 ते 2014 पर्यंत सुरू असलेल्या या मालिकेनं सुशांतच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं. या मालिकेमुळेच पुढे सुशांतनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यामुळे, सुशांतच्या चाहत्यांसाठी ही मालिक नेहमीच खास असणार आहे. अशात आता या मालिकेचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. मात्र, यात सुशांतची भूमिका नसणार याची खंत त्याच्या चाहत्यांना नक्कीच असेल. या मालिकेतील सुशांत आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) म्हणजेच अर्चना आणि मानव यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता ओटीटीवर पाहायला मिळणार पवित्र रिश्ता - या मालिकेचा प्रेक्षक वर्ग मोठा होता. त्यामुळे, अनेकांना आजही यातील प्रत्येक पात्र लक्षात आहे. या शोची प्रसिद्धी पाहता निर्मात्यांनी याचा दुसरा सीजन आणण्याचा निर्णय घेतला आहे. पवित्र रिश्ताचा दुसरा भाग (Pavitra Rishta 2)लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकता कपूर आपल्या या लोकप्रिय सीरियलचा दुसरा सीजन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार आहे. पवित्र रिश्ताचे दिग्दर्शक कुशल जावेरी यांनी या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे. कुशल जावेरी यांनी सांगितलं, की अंकिताचीदेखील या शोमध्ये भूमिका असेल. कुशल जावेरी म्हणाले, की लवकरच पवित्रा रिश्ता या मालिकेचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकितानं मला फोनवर सांगितलं, की तिनं हा शो साईन केला आहे. मी हे ऐकून खूप आनंदी झालो. कारण, पवित्रा रिश्ता आजही प्रेक्षक आणि माझ्या मनाच्या अत्यंत जवळ आहे. अंकिता लोखंडेही झळकणार - कुशाल जावेरी पुढे म्हणाले, की त्यांना पवित्र रिश्ता 2 सोबत जोडलं जाणं नक्कीच आवडेल. दिग्दर्शक म्हणून यासाठी काम केलं नाही , तरी ते सर्व माहिती घेत राहातील. अंकिता तिचा रोल खूप चांगल्या पद्धतीनं साकारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, यात अंकिताच्या अपोझिट कोण झळकणार याबाबत अद्यापही खुलासा करण्यात आला नाही. सुशांतला मिळाली होती विशेष पसंती - या सीरियलसाठी सुशांतच्या जागी इतर कोणालाही घेणं सोपी गोष्ट नाही. कारण, सुशांतच्या पात्रानं या मालिकेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती आणि त्याच्या भूमिकेला लोकांची विशेष पसंतीही मिळत होती. त्यामुळे, याजागी आता कोणाची वर्णी लागते हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.