मुंबई 17 मार्च**:** बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘थलायवी’ (Thalaivi) असं आहे. हा चित्रपट तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी या चित्रपटावर टीका करत कंगनाला यामध्ये घ्यायला नको हवं होतं, असा टोला लगावला आहे. राम गोपाल वर्मा सध्या आपल्या आगामी ‘डी कंपनी’ (D Company) या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कंगनाच्या ‘थलायवी’ या चित्रपटावर भाष्य केलं. ते म्हणाले, “कंगना रणौतला मी जयललिता यांच्या भूमिकेत पाहूच शकत नाही. दक्षिणेत जयललिता यांचं नाव खुप मानानं घेतलं जातं. या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेसाठी एखाद्या अनुभवी अभिनेत्रीची निवड करायला हवी होती. जिचं वय 50 पेक्षा अधिक असणं अपेक्षित होतं. केवळ मेकअप करुन त्यांच्यासारखं बेअरिंग पकडणं सोप काम नव्हे. मी जर या चित्रपटाचा निर्माता असतो तर मी कंगनाचा विचार देखील केला नसता.” असा टोला त्यांनी लगावला. अवश्य पाहा - ‘त्याच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय’; कोरोनासंक्रमित मनोज वाजपेयी संतापला
तसंच, “मला वाटत नाही की, कंगना आणि मी एकत्र कधी चित्रपट करु शकू. कंगनाची प्रतिमा मिक्स बॅगची आहे. तिनं कोणत्याही प्रकारची भूमिका साकारली तरी, ते पाहून पात्रं तिच्या वास्तविक जीवनासारखंच असल्यासारखं वाटतं. कंगनासाठी माझ्या मनात कोणतीही कथा किंवा प्रोजेक्ट नाही.” असंही स्पष्टीकरण त्यांनी या मुलाखतीत दिलं. कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय थलायवी हा तिचा ड्रिम प्रोजेक्ट आहे असंही ती म्हणाली. या पार्श्वभूमीवर कंगना आता राम गोपाल वर्मा यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. अद्याप तिनं यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.