दिल्ली, 24 ऑक्टोबर: अनेक दिवसांपासून ज्या ग्रँड वेडिंगची चर्चा सुरू होती ते आज पार पडलं आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये नेहा आणि रोहनप्रीत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गुलाबी रंगाच्या शेडमध्ये नेहाने लग्नाचा लेहंगा घातला होता. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अतिशय पारंपरिक पद्धतीने झालेल्या या लग्नसोहळ्यामध्ये दोघांचंही कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होता. पंजाबमध्ये त्यांचं रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला त्यांचं कुटुंब आणि बॉलिवूडमधील काही कलाकारही उपस्थित राहणार आहेत. नेहाच्या हळदीचे, संगीत सेरिमनीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते. तिच्या चाहत्यांना आता तिच्या लग्नाचीच प्रतीक्षा होती. अखेर नेहाने रोहनप्रीतच्या गळ्यात माळ घातली. नेहा आणि रोहनप्रीतचे फॅन्स तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.
नेहा कक्कर नेमकं कोणाशी लग्न करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोडल्या गेल्या होत्या. तिचं नाव काही तरुणांशी जोडलं गेलं होतं. पण आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.