मुंबई 26 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर (Social Media) बरीच सक्रीय असते. अनेक मुद्द्यांवर आपलं मत परखडपणे मांडणारी कंगना अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येते. मात्र, तरीही अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत न डगमगता मांडताना दिसते. कोणी कौतुक करो किंवा न करो मात्र कंगना अनेकदा स्वतःच कौतुकही करताना दिसते. अशात आता अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी चर्चेचा विषय आहे, कंगनाची श्रीदेवींसोबत तुलना. कंगना कधी स्वतःला टॉम क्रूजपेक्षाही चांगली स्टंट करणारी असल्याचं सांगते तर कधी मेरिल स्ट्रीपसोबत स्वतःची तुलना करते. अशात आता कंगनानं एक नवा दावा केला आहे. तिचं आता असं म्हणणं आहे, की हिंदुस्तानात श्रीदेवींनंतर ती एकमेव अशी अभिनेत्री आहे, जी पडद्यावर उत्तम पद्धतीनं कॉमेडी करते. तिच्या या ट्वीटनंतर अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. कंगनाच्या तनु वेड्स मनु या सिनेमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानं कंगनानं एक ट्वीट केलं आहे. यात तिनं लिहिलं, की मी याआधी अतिशय निरुत्साही आणि विक्षिप्त भूमिका साकारायचे. मात्र, या सिनेमानं माझ्या करिअरची दिशाच बदलली. या सिनेमानं मला मुख्य धारेत कॉमेडीमध्ये प्रवेश करुन दिला. क्वीन आणि दत्तोनं माझ्या कॉमिक टायमिंगला अधिक मजबूत केलं आमि श्रीदेवी यांच्यानंतर कॉमेडी करणारी मी एकमेव अभिनेत्री ठरले.
आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलं, की या सिनेमासाठी आनंद एल राय आणि लेखक हिमांशू शर्मा यांचे आभार मानते. जेव्हा ते हा चित्रपट घेऊन माझ्याजवळ आले तेव्हा मला वाटलं, की मी त्यांचं करिअर बनवू शकते, मात्र त्यांनीच माझं करिअर बनवलं. कोणीच सांगू शकत नाही, की कोणता चित्रपट चालेल आणि कोणता नाही. सगळं नशीब आहे. आनंद आहे, की माझ्या नशीबात तुम्ही आहात.
श्रीदेवीसोबत स्वतःची तुलना केल्यानंतर सोशल मीडियावर लोक कंगनाला ट्रोल करताना दिसत आहेत. काहींनी कंगनाचं हे ट्वीट उत्तम विनोद असल्याचं म्हटलं, तर काहींनी म्हटलं, की कॉमेडियन भारतीही तुझ्यापेक्षा चांगली आहे. एका युजरनं तर कंगनाला थेट विचारलं, की तू कधी माधुरी दीक्षितचं नाव ऐकलं आहेस का? कंगनाच्या या ट्वीटनंतर ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.