मुंबई 12 मार्च: गेला बराच काळ सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या अभिनेत्री पूजा भट्टनं (Pooja Bhatt) बॉम्बे बेगम्स (Bombay Begums) या वेब सीरिजमधून पुनरागमन केलं आहे. मात्र नेटफ्लिक्सची ही नवी सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या सीरिजमध्ये लहान मुलांचं आक्षेपार्ह चित्रण केलं गेलं आहे असा आरोप करण्यात येत आहे. शिवाय राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगनं (NCPCR) तर थेट बॉम्बे बेगम्सवर बंदी घालण्याचीच मागणी केली आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी बॉम्बे बेगम्स (Bombay Begums) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. महिला केंद्रित पटकथा असल्यामुळं ही सीरिज गेले अनेक महिने चर्चेत होती. परंतु प्रदर्शित होताच या सीरिजवर बंदीची मागणी केली जात आहे. NCPCR नं या सीरिजचं प्रक्षेपण रोखण्यासाठी नेटफ्लिक्सविरोधात (Netflix) नोटिस जारी केली आहे. शिवाय 24 तासांच्या आत या प्रकरावर त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. जर त्यांनी लहान मुलांचं असं आक्षेपार्ह चित्रण का केलं याचं स्पष्टीकरण दिलं नाही तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांना देण्यात आला आहे. अवश्य पाहा - कंगना रणौतला होणार अटक? जावेद अख्तर यांच्याशी पंगा घेणं पडलं भारी बॉम्बे बेगम्समध्ये लहान मुलांना सेक्स करताना व मादक पदार्थांचं सेवन करताना दाखवण्यात आलं आहे. अशा प्रकारच्या चित्रणामुळं समाजावर विपरित परिणाम होतो. समाजात चूकीचा संदेश पोहोचतो. यामुळं लहान मुलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढू शकतं. अशी दृश्य चूकीच्या घटनांना प्रोत्साहन देतात असा आरोप NCPCRनं नेटफ्लिक्सविरोधात केला आहे. शिवाय या विरोधात स्पष्टीकरण देखील देण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत स्पष्टीकरण दिलं जात नाही तोपर्यंत सीरिजवरील बंदी हटवणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.