मुंबई, 22 नोव्हेंबर: ड्रग प्रकरणात (Drug Case) प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) हिच्या अटकेनअतंर आता तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limabchiya) याला देखील एनसीबीने (NCB) अटक केली आहे. शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हर्ष लिंबाचिया याची जवळपास 18 तास चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. आज भारती आणि हर्ष दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले आहे.
भारतीला एनडीपीएस अधिनियम 1986 नुसार अटक करण्यात आली आहे. भारतीचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसमधून NCB नं शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याशिवाय NCB ने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात देखील छापेमारी केली आहे. भारती सिंहच्या घरावर छापेमारीसाठी एनसीबी संपूर्ण पथकासह पोहचली होती. एनसीबीच्या इतर दोन टीम तिच्या दोन वेगवेगळ्या घरावर पोहचल्या होत्या बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh) आणि तिचा पती हर्ष यांचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसवर ड्रग्स प्रकरणात एनसीबीनं छापेमारी केली. या छापेमारीतून नार्कोटिक्स कंंट्रोल ब्युरोने काही प्रमाणात ड्रग्ज देखील जप्त केले आहेत, अशी माहिती समीर वानखेडे (आयआरएस झोनल डायरेक्टर, एनसीबी, मुंबई) यांनी दिली आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून भारती सिंह हा घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. अशावेळी ड्रग प्रकरणात तिला आणि तिच्या नवऱ्याला झालेली अटक चाहत्यांसाठी आणि टेलिव्हिजन विश्वासाठी खळबळजनक आहे.