मुंबई, 15 मार्च: जगभरात कोरोना विषाणूचा उद्भाव (Corona Pandemic) झाल्यानंतर, देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय कामगारांसाठी बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देवदूत ठरला होता. या काळात सोनूने हजारो कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी प्रवासाची व्यवस्था करून दिली होती. त्यांनतर आता कोरोना विषाणूची तीव्रता कमी झाल्यानंतरही त्याचा मदतीचा ओघ सुरूचं आहे. गेल्या काही काळात त्याने अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. अलीकडेचं सोनू सूद एका मुलीसाठी पून्हा एकदा देवदूत ठरला आहे. कुटुंबीयांच्या आर्थिक तंगीमुळे संबंधित मुलगी गेल्या दोन वर्षांपासूनचं किडनी ट्रान्सप्लांट (Sonu Sood help a girl for kidney transplant) करू शकली नव्हती. अशावेळी सोनू सूदने मदत केल्यानं तिच ऑपरेशन होऊ शकलं आहे. बॉलीवूड अभिनेता सोनूने या मुलीला नवीन जीवन देण्याचं काम केलं आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून, संबंधित मुलगी किडनीच्या समस्येने ग्रस्त होती. या त्रासामुळे ती जीवन मरणाच्या दारात अडकली होती. कारण गरिबीमुळे तिचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करणं अवघड जात होतं. पण सोनूने आर्थिक मदत केल्यानं संबंधित मुलीला जीवनदान मिळालं आहे. या मुलीचं नाव पूनम असून तिने सोनू सूदकडे मदत मागितली होती.
यानंतर सोनूने तिला उपचारासाठी आवश्यक ती आर्थिक मदत केली होती. मुलीच्या ऑपरेशननंतर मुलीच्या भावानं एक ट्वीट करून सोनूचे आभार मानले आहे. त्याने ट्विटरवर लिहिलं की, ‘माझ्या बहिणीला नवीन जीवन दिल्याबद्दल धन्यवाद. आर्थिक अडचणींमुळे गेल्या 2 वर्षांपासून उपचार रखडले होते. परंतु तुमच्यामुळे एका महिन्यातच मूत्रपिंड प्रत्यारोपण करणं शक्य झालं. माझ्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी आणि आम्हाला मदत करण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर.’ या ट्वीटला सोनूने कोट करीत लिहिलं की, ‘ऊपर वाले का भी जवाब नही!’. हे ही वाचा- गरजू मुलांना शिक्षणासाठी सोनू सूदकडून Scholarship; कसा भरायचा अर्ज वाचा सोनू सूदने अशाप्रकारे एखाद्याची मदत करून एखाद्याचा जीव वाचवण्याची पहिलीच वेळ नाही. सोनूने अनके विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत अनेकांना मदत केली आहे. देशभरातील अनेक लोकं सोनूकडे त्यांच्या समस्या मांडतात आणि सोनूही त्यांना सढळ हाताना मदत करतो. अलीकडेच 1 लाख बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा सोनू सूदने केली आहे. त्याच्या या घोषणेनंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.