मुंबई, 20 नोव्हेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू (Sushant Singh Rajput Death) बॉलिवूडसाठी खूप मोठा धक्का होता. त्याचे चाहते अद्याप त्यांच्या आवडत्या कलाकाराचं असं अचानक निघून जाणं विसरू शकले नाही आहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या विविध अँगलचा तपास केंद्रीय संस्था करत आहेत. त्याच्या मृत्यूमागील गुढ अद्यापही उलगडले नाही आहे. तसंच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ट्रोलिंगची देखील शिकार व्हावं लागलं होतं. हे सत्र अद्यापही कायम आहे. अभिनेता रणवीर सिंहला (Ranveer Singh) आता त्याच्या एका जाहिरातीमुळे ट्रोल केलं जात आहे. यामध्ये रणवीरने सुशांतची खिल्ली उडवल्याचा आरोप त्याचे चाहते करत आहेत. रणवीरची बिंगो मॅड अँगलची (Bingo Mad Angles) ची जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. या जाहिरातीच्या माध्यमातून रणवीरने सुशांत सिंहची खिल्ली उडवल्याचा आरोप चाहते करत आहेत. या जाहिरातीमध्ये नातेवाईक रणवीरला सारखं सारखं भविष्यासाठी काय प्लॅन्स आहेत असं विचारत आहेत, त्यावर उत्तर देताना रणवीर काही विज्ञानाशी संबंधित वाक्य वापरून नातेवाईकांना गप्प करतो. अशाप्रकारे वापरण्यात आलेली वाक्यच चाहत्यांना खटकली आहेत. हे सहन केले जाणार नाही, असंही अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या जाहिरातीनंतर सोशल मीडियावर #BoycotBingo असा हॅशटॅग देखील ट्रेंड होत होता. अशाप्रकारे सुशांतच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप रणवीरवर करण्यात येत आहे. सुशांतबाबत केलेली गंमत सहन केली जाणार नाही, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.