परिस्थितीला नमवून 'ही' 5 गरिबाची पोरं झाली IAS, वाचा प्रेरणादायी कहाणी
मुंबई, 07 मे : देशभरातून लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देतात, पण फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश मिळतं. तुम्ही यूपीएससी परीक्षेची तयारी करीत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा 5 आयएसएस अधिकाऱ्यांबद्दल माहिती देत आहोत, ज्यांनी खडतर परिस्थितीवर मात करत यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. प्रचंड मेहनत, जिद्द, अभ्यासवृत्ती या बळावर त्यांनी हे ध्येय गाठलं. 1.अन्सार अहमद शेख- वयाच्या 21 व्या वर्षी अन्सार अहमद शेख यांनी स्वतःचं आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी खूप कष्ट घेतले. अन्सार यांचा प्रवास अतिशय खडतर असून तो यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे. अन्सार यांचे वडील योनुस शेख अहमद हे ऑटो रिक्षाचालक होते. अन्सार यांचे आयएएस होण्याचं ध्येय पूर्ण व्हावे, यासाठी त्यांच्या भावानं शाळा सोडली आणि मेकॅनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अन्सार यांनीही वडिल, भावाच्या कष्टाची जाण ठेवत यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू ठेवली. सलग तीन वर्ष दररोज 12 तास ते अभ्यास करीत होते. अखेर 2015 मध्ये ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. सर्वांत कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची 2015 मध्ये खूप चर्चा झाली होती. **2.एम शिवगुरु प्रभाकरन-**आयएएस अधिकारी एम शिवगुरू प्रभाकरन यांचीही कहाणी खूप संघर्षमय व प्रेरणादायी अशीच आहे. प्रभाकरन यांचे वडील दारूच्या आहारी गेले होते. तर, त्यांची आई आणि बहीण तंजावरमध्ये नारळ विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. या अडथळ्यांना न जुमानता यूपीएससी परीक्षा देऊन अधिकारी होण्याची एम शिवगुरू प्रभाकरन यांची इच्छा होती. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इंजिनीअरिंग केल्यानंतर आयएएस बनण्यासाठी यूपीएससीची तयारी करणं त्यांच्यासाठी कठीण होतं. पण त्यांनी हा मार्ग स्वीकारला, व त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. त्यांनी सेंट थॉमस माउंट येथे काहीकाळ गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षवलं. एमटेक पदवीही पूर्ण केली, व 2017 मध्ये यूपीएससी परीक्षेत देशात 101 वा क्रमांक मिळवत आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. IITतून पदवी, महिना 50 लाखांची नोकरी; सगळं सोडून सुरू केली दूध विक्री, थक्क करणारी यशोगाथा
**3.श्रीधान्या सुरेश-**श्रीधान्या सुरेश या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या केरळच्या आदिवासी जमातीतील पहिल्या महिला आहेत. यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंटरव्ह्यूला जाण्यासाठी श्रीधान्या यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा त्यांच्या मैत्रिणींनी पैसे गोळा करून त्यांना इंटरव्ह्यूला नवी दिल्लीला पाठवण्यास मदत केली होती. सध्या त्या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. संघर्षमय परिस्थितीवर मात करून आयएएस अधिकारी बनलेल्या श्रीधान्या सुरेश यांची कहाणी यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
4.अंशुमन राज- बिहारच्या बक्सर या छोट्याशा गावात अंशुमन राज यांचा जन्म झाला. दहावीपर्यंत त्यांच्या घरात वीज नव्हती. त्यामुळे त्यांनी रात्रीच्या वेळी रॉकेलच्या कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करून शिक्षण घेतलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अंशुमन यांनी यूपीएससी परीक्षेसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नव्हता. अखेर चौथ्या प्रयत्नात त्यांना यूपीएससीमध्ये यश मिळालं, व त्यांच आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. 5. के. जयगणेश- के. जयगणेश यांचा जन्म विनावमंगलम या गावात एका गरीब कुटुंबात झाला. कुटुंबातील मुलांपैकी सर्वांत मोठा असल्यानं त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी होती. सुरुवातीला त्यांनी गावामध्येच राहून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली, व ही परीक्षा दिली. परंतु या परीक्षेत त्यांना तीन वेळा अपयश आलं. त्यानंतर त्यांनी ठरवलं की, या परीक्षेची तयारी करण्यासाठी चेन्नईला जायचं. चेन्नईला गेल्यानंतर त्यांनी अण्णानगर येथील ऑल-इंडिया इन्स्टिट्युट फॉर आयएएसमध्ये कोचिंग क्लास लावला, पण स्वतःचा खर्च करण्यासाठी थोडेफार पैसे मिळावेत, यासाठी जवळच्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. अखेर 2007 च्या यूपीएससी परीक्षेत त्यांना यश मिळालं. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले, व त्यांना 156 वी रँक मिळाली. संघर्षमय परिस्थितीवर मात करीत अखेर त्यांनी आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.