IAS कृती राज
झाशी, 13 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील झाशी येथील रहिवासी असलेल्या कृती राज यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून फक्त त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे नाव उंचावले आहे. अनेक अडचणी आणि कोरोना काळादरम्यान त्यांनी 2020 मध्ये UPSC परीक्षा दिली. त्या सध्या उत्तर प्रदेश केडरमध्ये तैनात आहेत. त्यांनी आपल्या मीडिया मुलाखतींमध्ये विद्यार्थ्यांसाठी UPSC परीक्षेच्या तयारीच्या अनेक टिप्स शेअर केल्या आहेत. आज जाणून घेऊयात, IAS कृती राज यांचा प्रेरणादायी प्रवास. IAS कृती राज या उत्तर प्रदेशातील झाशी या ऐतिहासिक शहराच्या रहिवासी आहेत. झाशीच्या सेंट फ्रान्सिस कॉन्व्हेंट स्कूलमधून त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर जय अकादमीतून 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाली. कृती राज यांनी BIET झांसी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech ची पदवी घेतली आहे. B.Tech पूर्ण केल्यानंतर कृती यांना त्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा नव्हती. त्यांना तळागाळात काहीतरी करायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी कल्पवृक्ष वेल्फेअर फाऊंडेशन नावाची एनजीओ सुरू केली. यामध्ये महिला आणि बालकल्याणाची कामे केली जातात. यासोबतच त्यांनी नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेत तयारी सुरू केली. त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नागरी सेवेत गेल्याने अधिक चांगली मदत होऊ शकते, असा त्यांच्या दृष्टिकोन होता. IAS कृती राज यांनी 2020 मध्ये UPSC परीक्षा दिली होती. या दरम्यान कोरोनामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यूसारखी परिस्थिती होती. त्यांनी स्वयंअभ्यासातून यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. गेल्या UPSC मुख्य परीक्षेच्या वेळी भोपाळमध्ये कर्फ्यू होता. अशा स्थितीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी कृती राज यांना कसेबसे परीक्षा केंद्रावर नेले. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी त्या केंद्रावर पोहोचू शकल्या होत्या. हेही वाचा - इंजिनीअर तरुणीचा UPSC करण्याचा निर्णय, तब्बल 5 वेळा अपयश पण शेवटी तिनं करुन दाखवलंच! कृती राज यांच्या UPSC मुलाखतीदरम्यान एक मजेदार घटना घडली. जेव्हा त्या मुलाखत हॉलमध्ये पोहोचल्या तेव्हा बोर्ड सदस्याने त्यांना जेवण केले की नाही, असे विचारले. यावर त्यांनी सकाळचा नाश्ता करून आल्याचे उत्तर दिले. त्यांचे उत्तर ऐकून सर्व मंडळाचे सदस्य हसू लागले आणि वातावरण अतिशय खेळीमेळीचे झाले. त्यांची मुलाखत सुमारे 25 मिनिटे चालली आणि यामध्ये त्यांना त्यांची एनजीओ आणि हवामान बदल इत्यादींबद्दल विचारण्यात आले. IAS कृती राज यांनी UPSC 2020 परीक्षेत 106 वा क्रमांक मिळविला. त्यांनी जुलै 2019 पासून नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीचे 8-10 महिने त्यांनी रोज 8-10 तास अभ्यास केला. त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर त्यांनी आपली रणनीती बदलली आणि चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित केले. यूपीएससीच्या मुलाखतीदरम्यान तुमच्या क्षेत्राशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची माहिती घेणे महत्त्वाचे असते, असा सल्ला त्या यूपीएससी उमेदवारांना देतात. त्यांचा हा प्रवास यूपीएससी उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.