नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यामध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य रणनीती आखणे आवश्यक आहे. यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना विविध सेवांमध्ये नोकरीचे वाटप केले जाते. प्रचंड मेहनत करुन या परीक्षेत उमेदवार उत्तीर्ण होता. आज जाणून घेऊयात आयआरएस नमिता शर्मा यांचा यशस्वी प्रवास. नमिता शर्मा अभियांत्रिकीचा अभ्यास करून नोकरी मिळवल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. तब्बल 5 प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याला कसे यश मिळाले, ते जाणून घ्या. नोकरीत मन लागले नाही - नमिता शर्मा या दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. अभियांत्रिकीचे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी IBM मध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण तिथेही त्यांचे मन लागले नाही. नोकरीदरम्यान त्या त्यांच्या कामावर खूश नव्हत्या आणि काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानंतर नमिता शर्मा यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 5 वेळा अपयश - आयआरएस नमिता शर्मा यूपीएससी परीक्षेत तब्बल 5 वेळा नापास झाल्या. यातून 4 वेळा तर त्या प्रिलिम्स परीक्षाही पास करू शकल्या नाहीत. तेव्हा त्यांना समजले की, त्या खूप अभ्यास करतात पण कदाचित पद्धत चुकीची असावी. त्या न समजता परीक्षेची तयारी करत होत्या. पण अनेक वेळा अपयशी होऊनही त्यांनी कधीही हार मानली नाही आणि त्या आपले ध्येय साध्य करण्यासाठी दुप्पट मेहनत करत राहिल्या. नमिता शर्मा यांनी त्यांच्या पाचव्या प्रयत्नात प्रिलिम आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती. पण यावेळी त्या मुलाखतीत अवघ्या काही गुणांनी नापास झाल्या. अंतिम यादीत नाव न दिसल्याने यावेळी त्या निराश झाल्या होता. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. आता त्यांचा शेवटचा अटेम्प्ट बाकी होता. यासाठी त्यांनी त्यांनी परीक्षेची तयारी करण्याची पद्धत बदलली आणि पुन्हा मेहनत सुरू केली. यावेळी 2018 मध्ये 6 वा प्रयत्न केला आणि 145 वा क्रमांक मिळवून नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले. हेही वाचा - शाळेत असतानाच गमावली ऐकण्याची शक्ती, तीव्र तापात दिली परीक्षा, IAS सौम्या शर्माचा संघर्षमय प्रवास स्वतःवर विश्वास असणंही महत्त्वाचं - नमिता शर्मा यांनी UPSC परीक्षेसाठी त्यांची रणनीती शेअर केली आहे. इतर उमेदवारांना याचा खूप फायदा होऊ शकतो. त्यांच्या मते या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन समजून घेऊन योग्य रणनीती बनवणे आवश्यक आहे. त्या म्हणतात की, प्रत्येक दिवशी स्वत: ला सुधारण्यासाठी मार्गांचा विचार केला पाहिजे. तुमची स्पर्धा फक्त तुमच्याशीच आहे, असे समजा. तसंच स्वतःवर विश्वास असणंही महत्त्वाचं आहे. IRS नमिता शर्मा यांचे वडील दिल्ली पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक आहेत आणि आई गृहिणी आहेत. नमिता सध्या आयकर विभागात सहायक आयुक्त आहेत. त्यांचे पती श्रेयस हे फेलो आयआरटीएस अधिकारी आहेत. नमिता शर्मा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 45 हजारांहून अधिक आणि ट्विटरवर 12 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचा संघर्षमय प्रवास यूपीएसचीच्या उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.