गणेश दुडम (पुणे), 14 डिसेंबर : निसर्गावर पूर्णतःअवलंबून व पारंपरिक पीकपद्धतीमुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे तरुण पिढी याकडे आकर्षित होत नाही. मात्र, पुणे -मुंबई एक्स्प्रेसवे लगत असलेल्या उर्से गावातील एका तरुण शेतकऱ्याने एक एकर शेतात निशिगंधा या वेगळ्या जातीच्या गुलछडी फुलांच्या लागवडीचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. तो तरूण शेतकरी वर्षाकाठी जवळपास बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे.
मावळमधील तरुण शेतकरी प्रदीप धामणकर यांनी पारंपरिक शेतीला बगल देत फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. निशिगंध या फुलाची वेगळी जात बघून त्याने साताराहून तब्बल एक लाख कंद आणून सुवासिक गुलछडीची लागवड केली. त्यात चांगले उत्पन्न मिळत आहे.
हे ही वाचा : 12 महिने लागवड करा आणि 15 लाखांपर्यंत नफा कमवा, कशी करायची पपईची शेती?
मावळ तालुक्यात बहुतांश शेतकरी भाताची शेती करतात. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पीक उत्पन्नाला बसतो. परिणामी शेती व्यवसाय संकटात सापडत आहे.त्यामुळे लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. त्यामुळे पारंपरिक पीक पद्धतीसोबत नवीन प्रयोग करणे गरजेचे आहे.
एक एकर फुलशेतीमुळे धामणकर या तरुण शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. व्यवसाय म्हणून शेती केली तर निश्चितच तोट्यात येणार नाही, हे बोलके उदाहरण येथील शेतकऱ्याच्या फुलशेतीतून पुढे आले आहे.
हे ही वाचा : Beed : ‘आपले सरकार’वर 6 हजार तक्रारींचा पाढा, ‘या’ समस्यांची संख्या सर्वाधिक Video
वडील व पत्नी फुलशेतीसाठी त्यांना मदत करीत आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन नगदी पिकाकडे वळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता पारंपारीक शेती बरोबरच त्यात बदल करून शेती करने गरजेचे असल्याचे प्रदीप धामणकर यांनी सांगितले आहे.