मुंबई, 6 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील (Ahmednagar Civil Hospital Fire) आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. (CM Uddhav Thackeray orders probe into Ahmednagar Hospital fire)
आगीची घटना कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीची भीषणता दाखवणारे PHOTOS
— News18Lokmat (@News18lokmat) November 6, 2021
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सर्वच रुग्ण होरपळून जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. तर इतर रुग्ण जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
आयसीयू कक्षामध्ये 17 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली. त्यामुळे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला.
वाचा : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 10 जणांचा होरपळून मृत्यू, ही आहेत मृतकांची नावे
आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आलं आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डाला लागलेल्या आगीत 10 रुग्णांचा मृत्यू तर इतरही काही रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळाचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.
मृतकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटलं, "अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणाना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. ही अत्ंयत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जारीर करण्यात येत असून दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येईल."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Fire, Uddhav thackeray