सिद्धांत राज, प्रतिनिधी मुंगेर, 11 जून : ‘झाडे लावा झाडे जगवा’, हे ब्रीद पाळून अनेक पर्यावरणप्रेमी पर्यावरण सुदृढतेसाठी विविध प्रयत्न करत असतात. अनेकांचं निस्वार्थी कार्य पाहून तर अक्षरश: भारावून जायला होतं. बिहारच्या मुंगेर भागातील अनिल कुमार रामही त्यापैकीच एक. त्यांनी आतापर्यंत तब्बल 2500 हून अधिक विविध झाडं लावली आहेत. ही झाडं हिरवीगार आणि सुरक्षित राहावी यासाठी ते दररोज न चुकता त्यांना पाणी देतात. विशेष म्हणजे स्वखुशीने त्यांनी हे वृक्षारोपण केलेलं असून वैयक्तिक खर्चातून त्यांची देखभाल करतात. जिल्हा शिक्षण कार्यालयातून (डीईओ) सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणात वेचलं. हजारो झाडं लावून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला. शिवाय पर्यावरणाबाबत लोकांना जागरुक करण्याचं कामही ते सातत्याने करत असतात.
तब्बल 43 ते 44 अंश तापमानात रणरणत्या उन्हाचा, कडक उकाड्याचा कसलाही विचार न करता अनिल पाण्याची झारी, कुदळ घेऊन झाडांच्या संगोपनासाठी सायकलवरून निघतात. त्यांच्या या मेहनतीमुळेच मुंगेर जिल्हा मुख्यालयाच्या किल्ला परिसरापासून डीजे कॉलेज रोडच्या गुमती क्रमांक पाचपर्यंत झाडांची हिरवळ दिसते. Dombivli News : 5 वर्षाच्या चिमुरडीने केली एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर वडिलांसोबत यशस्वी चढाई, Video पाहून कराल कौतुक अनिल हे मूळचे मुंगेरच्या कृष्णपुरी भागातील रहिवासी. ते शिक्षण विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून निवृत्त झाले. 1997 पासून त्यांनी रोपं लावण्यास सुरुवात केली. त्यामागेही एक महत्त्वपूर्ण कारण आहे. अनिल कुमार राम एकेदिवशी कामानिमित्त बरियारपूरला गेले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर होतं. तिथे त्यांचं पाकीट चोरीला गेलं. त्यांच्या खिशात घरी परत येण्यासाठी किंवा काहीतरी खाण्यासाठी अजिबात पैसे नव्हते. मग ते कडक उन्हातून पायीच घरी यायला निघाले. त्यांच्याजवळ प्यायला पाणी नव्हतं की रस्त्याच्या कडेला एखादं झाडही नव्हतं. ज्याखाली बसून ते थोडावेळ सावलीत विश्रांती घेऊ शकतील. मग त्या क्षणापासून त्यांनी निश्चय केला की, या रस्त्याच्या कडेला आपण झाडं लावायची. आपल्याला सावली मिळाली नाही, परंतु इतरांना या रस्त्यावर सावली मिळायलाच हवी. याच विचारातून पर्यावरणाचा समतोल राखण्यात ते आज महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या उदात्त कार्यासाठी त्यांना विभागीय आयुक्त आणि अनेक सामाजिक संस्थांकडून गौरवण्यात आलं आहे. शिवाय त्यांना ‘पर्यावरण मित्र’ हा दर्जाही देण्यात आला आहे.