नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा ‘बधाई दो’ (Rajkumar Rao and Bhumi Pedanekar Badhai Do) चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. ‘बधाई दो’ या चित्रपटाने लॅव्हेंडर मॅरेजची संकल्पना प्रसिद्धीच्या झोतात आणली असून लग्न करताना लोकांना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला आहे. लॅव्हेंडर मॅरेज म्हणजे दोन व्यक्ती विरुद्ध लिंगाच्या लोकांशी लग्न करण्यास सहमती देतात. दरम्यान प्रियांजुल जोहरी नावाच्या तरुणाने हा सिनेमा थिएटरमध्ये पाहतानाचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो आपल्या जोडीदारासोबत बधाई दो चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. परंतु समोरच्या रांगेत बसलेल्या काही लोकांनी त्यांच्यालर समलिंगी जोडपं म्हणून लाजिरवाण्या कमेंट्स केल्या. तसंच चित्रपटाबद्दलदेखील विचित्र कमेंट केल्या.
इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये प्रियांजुलने याबद्दल माहिती दिली. चित्रपट पाहताना लोकांनी केलेल्या आक्षेपार्ह कमेंट्सबद्दल त्याने या पोस्टमध्ये सांगितलं. प्रियांजुल लोकांच्या कमेंट्सला वैतागला होता. त्यामुळे त्याने चित्रपटातील काही सीनवर टाळ्या वाजवल्या. वैतागलेल्या प्रियांजुलला सुरुवातीला त्याच्या पार्टनरने शांत राहण्याचा सल्ला दिला होता पण शेवटी समोर बसलेल्या एका व्यक्तीच्या कमेंटमुळे तो संतापला. त्या व्यक्तीने त्याला विचारलं की, 'तुला चित्रपट खूप आवडलेला दिसतोय, तू पण त्याच कॅटेगरीतला तर नाहीस ना?' यावर प्रियांजुलने जागेवर उभे राहत त्या लोकांची बोलती बंद केली.
हे वाचा-घाईत रेल्वे ट्रॅक ओलांडणं दुचाकीस्वाराला भोवलं; दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर, VIDEO
प्रियांजुल जागेवर उभा राहिला आणि 'होय ब्रो मी गे आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?' अशी विचारणा केली. तसंच त्याने त्याच्या पार्टनरसोबत असलेल्या नात्याबद्दल थिएटरमध्ये लोकांना माहिती दिली. त्यानंतर थिएटरमधील लोकांनी प्रियांजुलसाठी टाळ्या वाजवल्या. शिवाय एवढ्या लोकांमध्ये त्याने बोलण्याची हिंमत केल्याने त्याचं कौतुक केलं. प्रियांजुलच्या या पोस्टवर आयुष्यमान खुराना, भूमी पेडणेकर यांनीही कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
त्याने हा अनुभव इन्स्टावर पोस्ट केला आहे. त्याने यावेळी कॅप्शनमधून असा सवाल केला आहे की, 'थिएटरमध्ये LGBT+ चित्रपट पाहताना तुम्हालाही काही मनोरंजक/विचित्र/अस्वस्थ वाटलं का?' यावेळी त्याने शुभ मंगल ज्यादा सावधान, चंडीगढ करे आशिकी, एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटांची नावं नमुद केली आहे. हे चित्रपट समलैंगिक नात्यावर भाष्य करतात.
शेवटी प्रियांजुलने कॅप्शनमध्ये असं विचारलं आहे की, 'तुम्हाला काही वाटलं असेल तर या पोस्टवर कमेंट करा आणि जगाला कळू द्या की चित्रपट पाहण्यासारखी साधी गोष्ट काही लोकांसाठी कधीकधी खूप आव्हानात्मक असू शकते.'
तो सांगतो, 'सर्वांनी माझं म्हणणं ऐकलं आणि संपूर्ण थिएटर शांत झालं. लवकरच संपूर्ण थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आक्षेपार्ह कमेंट्स करणारा ग्रुप शांत झाला.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhumi pednekar, Rajkumar rao