नवी दिल्ली, 10 जानेवारी : भारतीय सेना देशाच्या सीमेच्या रक्षणासह कायमच गरजू नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये असाच एक भारतीय सेनेचा कौतुकास्पद व्हिडीओ समोर आला आहे. शनिवारी हाडं गोठवणाऱ्या थंडीत, बर्फवृष्टीमध्ये भारतीय सैनिकांनी अतिशय कौतुकास्पद काम केलं आहे. सततच्या बर्फवृष्टीमध्ये सेनेच्या जवानांनी गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यास मदत केली आहे. बोनियार तहसीलमधील नियंत्रण रेषेला लागून असलेल्या घग्गर हिल गावातून सेनेने आपत्कालीन स्थलांतर केलं. एका ट्विटर हँडलवरुन सेनेच्या जवानांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
खराब रस्ते आणि कठीण परिस्थितीतही जवानांनी महिलेला बोनियार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षितरित्या पोहचवलं. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सेनेला 8 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता एक कॉल आला. यात स्थानिक लोकांनी गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याची विनंती केली.
आपत्कालीन कॉलनंतर सेनेची मेडिकल टीम घटनास्थळी दाखल झाली. रुग्णाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याची गंभीर प्रकृती लक्षात घेता आपत्कालीन स्थितीतून बाहेर काढण्यासाठी नियोजन करण्यात आलं. सततच्या बर्फवृष्टीमुळे वाहन चालवणं अतिशय कठीण होतं. त्यामुळे सेनेकडून स्ट्रेचर तयार करण्यात आलं. एका सालासन ठिकाणापर्यंत तब्बल 6.5 किलोमीटर त्या स्ट्रेचरवर महिलेला नेण्यात आलं आणि त्यानंतर पुढे रुग्णवाहिकेतून सार्वजनिक आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आलं.
कडाक्याच्या थंडीत, सततच्या बर्फवृष्टीत सेनेने 6.5 किलोमीटरचं अंतर पार करुन रुग्णाला सुरक्षितरित्या रुग्णालयात पोहोचवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.