गंगटोक, 20 जानेवारी : आधी हम दो हमारे दो आणि आता फक्त एकच मूल बस्सं... असाच निर्णय बरेच दाम्पत्य घेत आहेत. पण अशात भारतातीलच एका राज्याच्या मुख्यमंत्री मात्र नागरिकांना जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहीत करत आहेत. 3 मुलं जन्माला घालणाऱ्यांना त्यांनी बक्षीस जारी केलं आहे. ही अजब घोषणा केली आहे ती सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी.
सिक्कीम हे भारतातील पहिलं असं राज्य असाव जिथं सरकार जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करत आहे. सरकारने याआधीच जास्तीत जास्त मुलांचा जन्म व्हावा म्हणून महिलांना 365 दिवसांची मातृत्तव रजा आणि पुरुष कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची पितृत्व रजा देत आहे.
तर रविवारी दक्षिण सिक्कीमच्या जोरेथांह शहरात एक कार्यक्रम झाला. त्यावेळी या कार्यक्रमात मुख्यमंत्री तमांग यांनी घोषणा केली की, "राज्य सरकारने महिला कर्मचाऱ्यांना दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यास एक वेतनवाढ, तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यास दोन वेतनवाढीचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. फक्त एक मूल असलेल्या महिलांना हा आर्थिक लाभ मिळणार नाही, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. सामान्य लोकांनाही जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. जे आरोग्य आणि महिला बालविकास विभागांद्वारे पाहिलं जाईल"
हे वाचा - गरोदरपणात उसाचा रस पिण्याचे फायदे आणि नुकसान, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
तमांग म्हणाले, "सरकारने सिक्कीमच्या रुग्णालयात आयव्हीएफ सुविधा सुरू केली आहे. नैसर्गिकरित्या गर्भधारणेत अडचणी असणाऱ्या महिलांना या प्रक्रियेच्या माध्यमातून मुलांना जन्म देता येईल. अशा पद्धतीने मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना तीन लाख रुपयांचं अनुदान दिलं जाईल"
तमांग यांनी आधीच्या सरकारवर सिक्कीमच्या नागिरकांवर फक्त एका मुलासह छोटं कुटुंब बनवण्यावर दबाव टाकला होता, असं म्हणत निशाणा साधला. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात प्रति महिला एक मूल यामुळे स्वदेशी समुदायाची लोकसंख्या घटते आहे. महिलांसह स्थानिक लोकांना जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहित करून घटता प्रजनन दर थांबवण्याची गरज आहे. आमचं सरकार स्थानिक लोकांना मोठ्आ कुटुंबासाठी प्रोत्साहन देत आहे.
हे वाचा - दीर्घायुष्याचं रहस्य कळलं? वाचा, शास्त्रज्ञांना काय आढळून आलं?
सध्याच्या घडीला सिक्कीमची लोकसंख्या अंदाजे सात लाखांपेक्षा कमी आहेत. त्यातील जवळपास ८० टक्के लोक स्थानिक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birth rate, Cm, Sikkim, Small baby