रांची 04 डिसेंबर : रस्ते अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. मात्र, यातील काही अपघात इतके विचित्र असतात की ते चर्चेचा विषय ठरतात. असाच एक अपघात झारखंडच्या लोहरदगामध्ये नॅशनल हायवे 143A वर झाला. इथे गाडीमध्ये चालक नसतानाही एक कंटेनर जवळपास एक किलोमीटरपर्यंत धावत राहिला. हे भीतीदायक दृश्य पाहून सगळेच घाबरले आणि एकच गोंधळ उडाला.
या घटनेत कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानंतर चालकाने आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर उडी घेतली. यानंतर कंटेनर अनेक झाडं, विजेचे खांब आणि दुकानांना उडवत रस्त्यावरुन चालला होता. लोहरदगा-गुमला महामार्गावरील लोहरदगा येथील पतराटोली येथे हे दृश्य पाहिल्यावर लोकांना धक्काच बसला. गाडी झाडाला आदळल्यानंतर झाडाचा मोठा भाग कंटेनरवरही पडला. त्यानंतरही कंटेनर धावतच होता. कंटेनरमध्ये चालक नसल्याचे पाहून लोक घाबरले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर एक किलोमीटर रस्त्यावरून चालत कंटेनर चालकाविनाच पतराटोली येथे पोहोचला. त्याचा वेग कमी झाल्यावर एका तरुणाने तो थांबवला. स्थानिक वॉर्ड कौन्सिलर कमला देवी, प्रत्यक्षदर्शी विमलकांत सिंह, यांनी सांगितलं की , सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंटेनरचा वेग कमी झाल्यावर एक तरुण कसा तरी ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला आणि त्याने वेळीच ब्रेक लावला. कंटेनर थांबवला नसता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
दुसरीकडे लोहरदगा पोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज कुमार शर्मा यांनी सांगितलं की, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. कंटेनर जप्त करण्यात आला आहे. चालकाचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. चालकाने आपला जीव वाचवण्यासाठी कंटेनरमधून उडी मारल्याचं लोकांनी सांगितलं. यानंतर तो कुठे गेला हे कोणालाही माहीत नाही. सध्या त्याचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Shocking accident