नवी दिल्ली, 15 डिसेंबर : जगात किती वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, याची पूर्ण कल्पना अद्याप आपल्यला आलेली नाही. वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती बघून त्याचा अंदाज येतो. प्रत्येक सजीवामध्ये काही तरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते, जी सर्वांना आश्चर्यचकित करीत असते. जेव्हा आपण एखादं झाडं तोडतो, तेव्हा त्याच्या आतून चिकट पदार्थ बाहेर पडतो, हे पाहिलं असेल. बऱ्याचवेळा हा पदार्थ पांढऱ्या रंगाचा असतो. काही लहान मुलं त्याला दूध असंदेखील म्हणतात. काही झाडांमधून डिंकासारखा पदार्थ बाहेर पडतो. तो पाण्यासारखा पारदर्शकदेखील असतो. जगात असंही एक झाड आहे, की जे कापल्यावर त्याच्या आतून माणसाप्रमाणे रक्त बाहेर येतं.
माणसाला दुखापत झाली किंवा कुठे तरी जखम झाली की, तिथून रक्त येऊ लागतं. जगात असं एक झाडदेखील आहे, ज्याच्या आतून लाल रक्त बाहेर येतं. हे जाणून तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल; पण हे सत्य असून अशी झाडं दक्षिण आफ्रिकेत आढळतात. सोबतच्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, की झाडातून रक्ताप्रमाणे लाल द्रव बाहेर पडत आहे. या झाडामध्ये खरंच माणसांसारखं रक्त असतं का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जाणून घेऊ या नेमका हा प्रकार काय आहे...
हे वाचा - एका मिनिटात चोरल्या 7 कोटींच्या 5 लग्जरी कार, पोलिसही चकित, पाहा Video
'ब्लडवुड ट्री' असं आहे झाडाचं नाव
‘ब्लडवुड ट्री’ या नावानं प्रसिद्ध असलेल्या या झाडाला ‘कियाट मुकवा’ किंवा ‘मुनिंगा’ असंही म्हणतात. त्याचं शास्त्रीय नाव 'सेरोकार्पस अँगोलान्सिस' आहे. हे झाड मोझांबिक, नामिबिया, टांझानिया, झिम्बाब्वे यांसारख्या देशांमध्येही दिसतं. हे झाड कापल्यावरच नाही, तर झाडाची फांदी तुटली तरी त्यातून मानवी रक्तासारखा लाल पदार्थ बाहेर पडतो; पण ते रक्त नसून तो एक द्रवपदार्थ असतो.
हे वाचा - चोराचा शहाणपणा अंगाशी आला; त्याच्या कल्पनेपेक्षा हुशार निघाला दुकानदार
चमत्कारिक झाड
माणसं या झाडाला चमत्कारिक झाड म्हणतात. कारण या झाडाचा उपयोग विविध औषधं बनवण्यासाठीही होतो. एवढंच नाही, तर रक्ताशी संबंधित आजारही या झाडापासून बनवलेल्या औषधांपासून बरे होतात. दात, डोळ्यांच्या समस्या, पोटाचे आजार, मलेरिया किंवा गंभीर दुखापत बरी करण्याची शक्तीही या झाडामध्ये आहे. या झाडाची उंची 12 ते 18 मीटर्सपर्यंत असते. या झाडाचं लाकूड खूप मौल्यवान आहे आणि ते खूप महाग विकलं जातं. फर्निचर बनवण्यासाठीही या झाडाचा उपयोग होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PHOTOS VIRAL, Tree, Tree plantation