Home /News /viral /

खाली Lockdown म्हणून आकाशातच बांधली लग्नगाठ; पोलिसांच्या इशाऱ्यानंतर वर-वधुच्या उत्साहाचं विमान लँड

खाली Lockdown म्हणून आकाशातच बांधली लग्नगाठ; पोलिसांच्या इशाऱ्यानंतर वर-वधुच्या उत्साहाचं विमान लँड

विवाह हा आयुष्यातला असा क्षण असतो, की ज्या वेळी वधू-वरांना अक्षरशः 'सातवे आसमान'पर असल्यासारखं वाटत असतं. मात्र या जोडप्याला फार काळ आकाशात राहता आलं नाही.

    मदुराई, 24 मे : विवाह हा आयुष्यातला असा क्षण असतो, की ज्या वेळी वधू-वरांना अक्षरशः 'सातवे आसमान'पर असल्यासारखं वाटत असतं. लग्नासाठी जमलेल्या वऱ्हाड्यांचा आनंद तर गननात मावत नसतो. कोविडच्या काळात मात्र या सगळ्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे बरेचसे विवाहसोहळे अगदी मोजक्या माणसांच्या उपस्थितीत उरकले; पण त्यातही ज्यांना मोठा सोहळा करूनच लग्न करायचं होतं, असेही काही जण होते आणि आहेतच. तशा अनेकांचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले. याच प्रकारची एक नवी घटना उघड झाली आहे. तमिळनाडूत लॉकडाउन (Lockdown) असल्यामुळे तिथल्या एका तरुण विवाहेच्छू जोडप्याने चक्क विमान भाड्याने घेऊन विमानाच्या प्रवासात जीवनप्रवासाच्या आणा-भाका घ्यायचं ठरवलं. त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी; पण हा आगळावेगळा विवाहसोहळा उत्साहाने पार पाडण्याच्या नादात त्यांच्याकडून आणि वऱ्हाड्यांकडून कोविडचा एकही नियम पाळला गेला नाही. विमानाच्या स्टाफकडून वारंवार विनंती करूनही नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे आता त्यांच्या उत्साहाचं विमान जमिनीवर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, कठोर कारवाईची शक्यता आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या हवाल्याने 'एनडीटीव्ही'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे 31 मेपर्यंत लॉकडाउन आहे. त्यामुळे या तरुण जोडप्याने एक वेगळी शक्कल लढवून आपल्या लग्नासाठी एका एजंटच्या माध्यमातून मदुराई ते बेंगळुरू अशा प्रवासासाठी स्पाइसजेटचं (Spicejet) विमान 23 मे रोजीसाठी बुक केलं. हे विमान लग्नासाठी बुक करण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र लग्नानंतरच्या प्रवासासाठी ते बुक करण्यात येत असल्याचं कंपनीला सांगण्यात आलं होतं, असं स्पाइसजेटने सांगितलं. हे ही वाचा-Shocking:कोरोनासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्कारात गर्दी 'संबंधितांना कोविड-19 संदर्भातल्या नियमावलीची (Covdi19 Rules) संपूर्ण कल्पना लेखी आणि तोंडी स्वरूपात देण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing), मास्क आणि अन्य नियम संपूर्ण प्रवासादरम्यान पाळण्याबद्दल सांगण्यात आलं होतं. तसंच विमानात कोणताही कार्यक्रम करण्याची परवानगीही त्यांनी देण्यात आली नव्हती. तरीही हा प्रकार घडला. तसंच, विमानातल्या क्रू मेंबर्सनी वारंवार सर्वांना विनंती करूनही काहीही उपयोग झाला नाही,' असं स्पाइसजेटकडून सांगण्यात आलं. बोइंग 737 (Boeing 737) विमानात झालेल्या या जोडप्याच्या विवाहाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडिओत नवरा मुलगा मुलीला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तसंच फोटोग्राफर हा क्षण टिपत असून, त्याच्या मागे विमानात गर्दीही दिसत आहे. नवरी मुलगी दागिने आणि फुलांचे गजरे वगैरे घालून नटलेली असून, नवरा मुलगा पारंपरिक दाक्षिणात्य वेशात दिसत आहे. सगळे जण विवाह सोहळ्यात आनंदाने रममाण झाल्याचं दिसत असून, बहुतांश जणांच्या तोंडावर मास्क नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही पत्ता नाही. विमान माणसांनी खचाखच भरलेलं असल्याचं या फोटो आणि व्हिडिओत दिसत आहे. हे ही वाचा-VIDEO: Lockdown चं उल्लंघन पडलं महागात; पोलिसांनी दिली चक्क नागीन डान्सची शिक्षा डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. विमान वाहतूक कंपनी, तसंच विमानतळाकडून याबद्दलचा संपूर्ण अहवाल मागवण्यात आला असून, विमानातल्या क्रू मेंबर्सना चौकशी होईपर्यंत कामावर रुजू न होण्याचे (Off Roastered) आदेश देण्यात आले आहेत. ज्यांनी कोविडच्या नियमांचं उल्लंघन केलं, त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 'स्पाइसजेटचं विमान मदुराईवरून काल बुक करण्यात आलं होतं. विमानात विवाह सोहळा होणार असल्याची कोणतीही कल्पना विमानतळाला नव्हती,' असं मदुराईच्या विमानतळाचे संचालक एस. सेंथिल वलवन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. 'नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमांनुसार योग्य ती कारवाई केली जाणार आहे,' असं स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona, Lockdown, Viral photo, Viral photoshoot

    पुढील बातम्या