जैसलमेर, 19 मे: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे (Corona) गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे एकूणच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्स आणि आवश्यक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध तसेच लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. परंतु, अनेक ठिकाणी नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसतात. अशा नागरिकांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी (Police) प्रसंगी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत आहेत. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना काठ्यांचा प्रसाद दिल्याचे व्हिडीओ (Video) सातत्याने व्हायरल होत आहेत. परंतु, सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, त्याची मोठी चर्चा आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील (Rajasthan) असून, नियम मोडणाऱ्या युवकांना पोलिसांनी शिक्षा म्हणून नागीन डान्स (Nagin Dance) करायला लावल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया...
कोरोनाची दुसरी लाट तीव्र असताना अनेक नागरिक लॉकडाऊन तसेच निर्बंधांकडे दुर्लक्ष करुन रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांना धडा शिकवण्यासाठी देशभरातील पोलीस नाविन्यपूर्ण शिक्षेचा अवलंब करताना दिसत आहेत. अशा वैशिष्ठपूर्ण शिक्षांचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सध्या अशाच एका शिक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ राजस्थानमधील आहे. लॉकडाऊनचे नियम मोडले म्हणून दोन तरुणांना रस्त्यावर नागीन डान्स करण्याची शिक्षा पोलिसांनी दिली. या व्हिडीओत हे दोन्ही तरुण नागीन डान्स करताना दिसत आहेत.
#Watch: Sources said that the video is from Jhalawar district and police are reportedly punishing such youths for coming out of their houses without any reason.#Covid19 pic.twitter.com/Pq3gcKuG4R
— IANS Tweets (@ians_india) May 16, 2021
वाचा: 300 पेक्षा जास्त Covid मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अखेर त्यालाच कोरोनानं गाठलं आणि...
न्यूज एजन्सी आयएएनएसनेच्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ राजस्थानमधील झालावार (Jhalawar) जिल्ह्यातील आहे. या व्हिडीओतील हे 2 तरुण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केलेला असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरत होते. या युवकांना पोलिसांनी नागीन डान्स करण्याची शिक्षा दिली आणि ते नागीन डान्स करतानाचा व्हिडीओ पोलिसांनी शूट केला. हे तरुण डान्स करीत असून पोलीस त्यांना डान्स सुरुच ठेवण्यास सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या युवकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगला चर्चेत आहे.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना,प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे सर्व नागरिकांनी पालन करणं आवश्यक असून,ते सर्वांच्या हिताचे देखील आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,लॉकडाउन, कडक निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन देखील प्रशासनाकडून सातत्यानं करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Viral videos