नाशिक, 11 ऑक्टोबर : तुम्ही अनेकदा इंग्रजीतील हे वाक्य ऐकलं असेल की- ‘Age is Just A Number’. आणि या वाक्याची प्रचिती देणारे आजीआजोबा देखील आपल्या आजुबाजुला असतात. कधी ते त्यांच्या लुक्समुळे, कधी फिटनेसमुळे तर कधी उत्साहामुळे सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. नाशिकमधल्या एका 68 वर्षांच्या आजीबाईंनी देखील सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या आजी सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. पावसाळ्यात तरुणाईचे पाय वळतात ते ट्रेकिंगकडे. यंदा कोरोनाच्या संकटात अनेकांना ही संधी मिळाली नाही, मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर छोटेमोठे ट्रेक करताना लोकं दिसत आहेत. नाशिकमध्ये अशी अनेक छोटीमोठी ट्रेकिंगची ठिकाणं आहेत. यापैकी हरिहर गड एक प्रसिद्ध ठिकाण आहे. जेवढा निसर्गाने नटलेला हा परिसर आहे, तेवढाच चढाईसाठी कठीण देखील आहे. पण नाशिकमधल्या या 68 वर्षांच्या आजींनी हा गड सर केला आहे. त्यांच्याबरोबर त्यांचा चिमुरडा नातू देखील होता. सोशल मीडियावर आजी-नातवाच्या या जोडीचे विशेष कौतुक केले जात आहे. त्यांच्याबरोबर आजींचा मुलगा आणि सून देखील होते. तरुणाईने या आजींकडून खूप काही शिकण्यासारखे नक्कीच आहे. (हे वाचा- टीव्हीची प्रसिद्ध खलनायिका लवकरच होणार आई, शेअर केला नवऱ्याबरोबरचा क्यूट VIDEO ) हरिहर गड चढण्यासाठी कठीण आहे कारण हा गड 80 अंशाच्या कोनात आहे, त्याचबरोबर समुद्रसपाटीपासून 3 हजार 676 फूट उंचावर हा गड आहे. महाराष्ट्रातील इतिहासाची साक्ष देणारा हा गड एकाच वेळी विलोभनीय आणि राकट देखील आहे. आजींनी हा गड सर केल्यानंतर त्यांचे आणि त्यांच्या नातवाचे कौतुक केले जात आहे. आशा आंबडे (Asha Ambade) असं या आजींचं नाव असून त्यांच्या नातवाचे नाव मृगांश आंबडे आहे. आजी गडावर पोहोचल्यावर त्याठिकाणी उपस्थित तरुणांनी दिलेली ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही घोषणा अंगावर काटा आणणारी आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. (हे वाचा- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेत दयाबेनची पुन्हा होणार एंट्री? ) पदर खोचून हरिहर गड सर करणाऱ्या आजी त्याठिकाणी पोहोचल्यावरही हसऱ्या चेहऱ्याने सर्वांना नमस्कार करत होत्या. ‘कमॉन आज्जी…’ असं म्हणत उत्साह वाढवणारी तरूण मुलं त्यांचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढत होती. अनेक नामवंतांनी देखील आजीबाईंचा व्हिडीओ शेअर करत त्यांना सलाम केला आहे. पाहा व्हिडीओ-
#aaji सलाम🙏🏽 pic.twitter.com/BuzNxpwjMb
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 8, 2020
आंबडे कुटुंबातील सर्वांना ट्रेकिंगची आवड आहे. या आजी देखील हा गड सर करतील असा विश्वास सर्वांना होता आणि जिद्दीने आजींनी हा गड सर केला देखील. आजींना आणि त्यांच्या जिद्दीला सलाम अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.