काबूल, 23 ऑगस्ट : तालिबानकडून (Taliban) महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या (atrocities against women) कहाण्या सर्वश्रुत आहेत. तालिबाननं सध्या अफगाणिस्तानची (Afghanistan) सत्ता मिळवल्यानंतर जुन्या काळातील तालिबानी अत्याचाराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. तालिबानच्या सत्ताकाळात महिलांना घराबाहेर पडणं शक्य नसल्यामुळे एका तरुणीनं पुरुष असल्याचं सोंग घेऊन तब्बल दहा वर्षं आपली आणि कुटुंबाची गुजराण केली. ही मुलगी म्हणजे प्रसिद्ध लेखिका नादिया गुलाम. (Nadiya Gulam)
बॉम्बस्फोटात गमावलं सर्वस्व
नादिया 8 वर्षांची असताना तिच्या घरावर बॉम्ब पडला. या हल्ल्यात नादियाचा भाऊ मारला गेला, तर नादिया गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार घेत असताना आपल्यापेक्षाही अधिक जखमी असलेले आणि बिकट अवस्था असणारे रुग्ण तिला दिसले. प्रत्येकाच्याच आयुष्यात संघर्ष असल्याची जाणीव तिला झाली. त्यापुढच्या आयुष्यात काहीही झालं तरी संघर्ष करण्याचा आणि पराभव न पत्करण्याचा निर्णय़ तिनं घेतला.
पोटासाठी बदललं रुप
भावाचा मृत्यू झाल्यामुळे घरातील बहिणींची आणि इतर महिलांची जबाबदारी घेण्यासाठी कुणीच पुरुष नव्हता. त्यात तालिबानची राजवट असल्यामुळे महिलांना कुठलीही नोकरी किंवा काम करायला परवानगी नव्हती. त्यामुळे नादियानं स्वतःचं रुप बदललं. आपल्या मृत भावाला तिने जणू जिवंत केलं आणि नादियाचा धाकटा भाऊ म्हणून तिने काम करायला सुरुवात केली.
अनेकदा थोडक्यात बचावली
नादियानं स्वतःची गुजराण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. काही दिवसांनंतर तर आपण मुलगी आहोत, हे ती स्वतःदेखील विसरून गेली होती. मात्र अनेकदा असे काही प्रसंग येत की तिची चोरी पकडली जाईल, असं वाटत असे. मात्र प्रत्येक वेळी सुदैवाने अशा कठीण प्रसंगातून थोडक्यात बचावली आणि तिचं गुपित कधीच फुटलं नाही. 15 वर्षांपूर्वीच एका एनजीओच्या मदतीनं नाादिया यांनी अफगाणिस्तान सोडलं. त्यांनी स्पेनमध्ये आसरा घेतला आणि तिथल्या एका पत्रकाराच्या मदतीनं स्वतःच्या आयुष्यावरचं पुस्तकही प्रकाशित केलं. त्यांचे इतर कुटुंबीय मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्येच राहतात.
हे वाचा -बांगड्या विकणाऱ्या तरुणाच्या मारहाणीनंतर वाद पेटला,काँग्रेस नेत्याकडून VIDEOशेअर
आता पुन्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांवरील निर्बंध आणि अत्याचाराच्या कहाण्या आठवू लागल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban, Women harasment