कीव, 02 मे : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्या एका सहाय्यकाने दावा केला आहे की, रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरूवातीस रशियन सैन्य राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की आणि त्यांच्या कुटुंबाला पकडण्यासाठी आले होते. मात्र, जेलेन्स्की कसे तरी वाचले आणि रशियाचा प्रयत्न फसला.
नियतकालिकातून बाब झाली उघड
डीएनए हिंदीनुसार, जेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ एंड्री यर्मक यांची मुलाखत टाइम मासिकाने इनसाइट जेलेन्स्की वर्ल्ड या नावाने प्रकाशित केली आहे. या मुलाखतीत, रशियन सैनिक कसे कीवमध्ये घुसले होते आणि त्यांना कोणत्याही प्रकारे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या कुटुंबाला पकडायचं होतं आणि त्यांना ठार मारायचं होतं, याचं एंड्री यांनी वर्णन केलं आहे. मात्र, हे असं करण्यात रशियन सैन्याला यश आलं नाही.
युद्धाच्या पहिल्या दिवशीच जेलेन्स्की लक्ष्य होते
24 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं. रशियन सैनिकांना पहिल्याच दिवशी राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांना त्यांच्या कुटुंबासह पकडायचं होतं. जेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ एंड्री यर्मक यांनी सांगितलं की, राष्ट्रपतींचं निवासस्थान रशियाच्या रडारवर आहे. अचानक, जेलेन्स्की यांच्या कार्यालयाबाहेर बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येऊ लागले, असं ते म्हणाले. आत गडबड झाली, काय करावं समजत नव्हतं. एंड्री पुढे म्हणाले की, लढाई सुरू झाल्याच्या काही तासांतच रशियन सैनिक जेलेन्स्की यांना शोधत आले होते. अध्यक्ष आणि त्यांचं कुटुंब आत होतं.
(हे वाचा - TIME नियकालिकाच्या मुखपृष्ठावर जेलेन्स्कींचा फोटो, काय आहे अध्यक्षांचा प्लॅन?)
जेलेन्स्की यांच्या रक्षकांनी कॅम्पस कसेतरी सील केले. आतील रक्षकांनी दिवे बंद केले आणि अध्यक्ष जेलेन्स्की आणि त्यांचे सहकारी बुलेट-प्रूफ जॅकेट आणि असॉल्ट रायफल घेऊन आले. त्यापैकी फक्त काही लोकांनाच शस्त्रं कशी वापरायची हे माहीत होतं. एंड्री म्हणाले की, जेलेन्स्की यांनी नंतर सांगितलं की, त्यांची पत्नी आणि मुलंदेखील तिथंच आहेत. एंड्री म्हणाले की, ज्या दिवशी रशियन सैन्य आलं, त्या दिवशी राष्ट्रपती कार्यालय सुरक्षित नाही, हे निश्चित झालं होतं. ते पुढे म्हणाले की, आम्ही हे सर्व फक्त चित्रपटात पाहिलं होतं. पण तो दिवस समोर पाहून अक्षरशः आश्चर्यचकित झालो आणि हादरलोही. युक्रेनियन सैन्यानं जेलेन्स्की यांनी कळवलं होतं की, रशियन स्ट्राइक टीमने कीवमध्ये पॅराशूट लँडिंग केलं आहे आणि राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या कुटुंबासह पकडायचं आहे.
(हे वाचा - किम जोंगचे बाप ठरतील असे 5 हुकूमशहा, एकाने तर करवले 15 लाख महिलांवर बलात्कार!)
अमेरिकेची ऑफर फेटाळण्यात आली
अमेरिकेला युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांना देशातून सुखरूप बाहेर काढायचं होतं, असं एंड्री म्हणाले. मात्र, जेलेन्स्की यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला. तेव्हा राष्ट्राच्या बाजूने उभं राहण्याचा निश्चय जेलेन्स्की यांनी केला होता. ते म्हणाले की, मला पळायचं नाही. तर, शस्त्रं हवी आहेत. झेलेन्स्की यांनी जगभरात राहणाऱ्या युक्रेनियन नागरिकांना रशियाविरुद्धच्या युद्धात सहभागी होण्याचं आवाहन केलं. युद्ध सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप युद्धाचा निकाल लागलेला नाही. दोन्ही देशांमधील युद्धाचा शेवट अद्याप होताना दिसत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news