वॉशिंग्टन, 19 जानेवारी: अमेरिकेत सध्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 59 वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन (Joe Biden), तर कमला हॅरीस या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील. कॅपिटल हिल्स या अमेरिकेच्या संसद भवनात हा समारंभ होणार आहे. कमला हॅरीस (Kamala Harris) या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरल्या असून, त्यांच्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कमला हॅरीस यांच्या पुतणीनं मीना हॅरीस हिनं शेअर केलेला एक टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बुधवारी, ज्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला, त्याच दिवशी मीना हॅरीसनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. दोन वेळा महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आलेले ट्रम्प हे एकमेव अध्यक्ष आहेत. या व्हिडीओमध्ये मीना या कमला हॅरीस यांना मिंट फ्लेवर्ड पीच देताना दिसत आहे. मीना त्यांना म्हणते, ‘आंटी, आय गॉट यु अ गिफ्ट, ‘Im-peach-mints!’ हे ऐकून कमला हॅरीस क्षणभर थबकलेल्या दिसतात, त्यानंतर त्या खळखळून हसताना दिसतात. या व्हिडीओला एक कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून, इन्स्टाग्राम, ट्विटरवरही त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. (हे वाचा- अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी? भारतीयांची उत्सुकता शिगेला ) दरम्यान या व्हिडीओत कमला हॅरीस या पँटसूट अशा पोशाखात दिसत असून, अमेरिकन तरूणाईशी जोडली जाईल अशी त्यांची फॅशन स्टाईल दिसते. विशेष महणजे त्यांनी हिल्स किंवा शूज घातलेले नसून फक्त सॉक्स घातलेले आहेत. पांढऱ्या रंगाच्या या सॉक्सला निळसर रंगाचे काठ असून, त्यावर ‘दी फ्युचर इज फिमेल’(The Future is Female) असं लिहिलं आहे.
ग्लॅमर रिपोर्टच्या वृत्तानुसार, कमला हॅरीस यांनी घातलेले सॉक्स गमबॉल पूडल (Gumball Poodle) कंपनीचे असून, त्यांची सर्व उत्पादने अमेरिकेतच बनवलेली असतात. सध्या 13 डॉलर्सला कंपनीच्या वेबसाईटवर हे सॉक्स विक्रीसाठी उपलब्ध असून, या व्हिडीओमुळे त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं ग्राहकांना हे सॉक्स पुरवण्यात उशीर होत आहे. अशा उपहासात्मक पद्धतीने आपलं मत स्पष्ट करत, सर्वांच लक्ष वेधून घेण्याची कमला हॅरीस यांची पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा त्यांनी मिळालेल्या विजयानिमित्त भाषण केलं होतं, त्यावेळी त्यांनी संपूर्ण पांढरा शुभ्र सूट घातला होता आणि त्यावर pussy bow लावला होता. त्यांची ही स्टाईल महिलांच्या मताधिकार चळवळीची आणि महिलांच्या आंदोलनांची आठवण करून देणारी होती.