काबूल 14 ऑगस्ट : तालिबान (Taliban) येत्या सात दिवसांच्या आत राजधानी काबूलसह (Kabul) संपूर्ण अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा करणार आहे, अशी माहिती तालिबान या इस्लामवादी समूहाच्या एका प्रवक्त्याने सीएनएन-न्यूज18ला दिली. तालिबानला हिंसा नको आहे, असा दावाही त्या प्रवक्त्याने केला. 'मानवजातीवर आलेल्या संकटाच्या काळात जगभरातल्या संस्था-संघटनांनी युद्धग्रस्त अफगाणिस्तानला साह्य करावं,' असं आवाहन या प्रवक्त्याने केलं. तसंच, तालिबानकडून कोणतीही परदेशी मिशन, परदेशी स्वयंसेवी संस्था किंवा परदेशी समूहावर हल्ला केला जाणार नाही, अशी ग्वाहीही तालिबानच्या या प्रवक्त्याने दिली.
अफगाणिस्तानमध्ये असलेल्या आपल्या देशाच्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनने शुक्रवारी (13 ऑगस्ट) हजारो सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले. कारण तालिबानने आक्रमक हल्ले करून अनेक प्रांतांच्या राजधान्यांची शहरं आणि अनेक क्षेत्रांवर कब्जा केला आहे. कंदाहार (Kandahar) या महत्त्वाच्या शहरावरही तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. आता अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवण्याच्या दिशेने तालिबान्यांनी आगेकूच सुरू केली आहे. त्यामुळे अमेरिका (USA) आणि ब्रिटनने (UK) आपल्या देशांचे सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला.
तालिबानची उघड धमकी! 'भारतानं अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवले तर...'
तालिबान्यांनी आता काबूलला लागून असलेल्या लोगार (Logar Province) प्रांताची राजधानीही आपल्या ताब्यात घेतली आहे. पुल-ए-आझम या राजधानीच्या शहरातलं पोलीस मुख्यालय आणि शहरातल्या तुरुंगावर तालिबानी बंडखोरांनी कब्जा मिळवल्याचं त्यांच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं.
तालिबानने शहरी केंद्रांवर आठ दिवस हल्ले केल्यानंतर अफगाणिस्तान सरकारने आता देशाच्या दोन-तृतीयांशहून अधिक भागावरचं नियंत्रण गमावलं आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्याच्या फौजा मागे बोलावण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी घेतला होता. त्यानंतर मे महिन्यापासून तालिबान्यांनी देशात हिंसाचाराला (Violence) सुरुवात करून एकेक भाग काबीज करायला सुरुवात केली. त्यामुळे बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली जात आहे. दरम्यान, जो बायडेन यांनी मात्र सैन्य माघारी बोलावण्याच्या आपल्या निर्णयाचा अजिबात पश्चात्ताप होत नसल्याचं मंगळवारी (10 ऑगस्ट) सांगितलं. तसंच, आपल्या देशासाठी लढण्याचं आवाहन त्यांनी अफगाणी नेत्यांना केलं आहे. शेवटच्या फौजा 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडणार आहेत.
कराड यांच्या 'आशीर्वाद' यात्रेत पंकजा मुंडे सहभागी होणार? कराड यांनीच दिले संकेत
पाकिस्तानच्या (Pakistan Border) सीमेवर असलेल्या कंदाहार आणि दक्षिण व पूर्वेतल्या अन्य प्रांतांमध्ये तालिबानची शक्ती पूर्वीपासूनच जास्त आहे; मात्र गेल्या काही आठवड्यांत उत्तरेकडच्या भागांतही तालिबान्यांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून वर्चस्व प्राप्त केलं आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानात चालवलेला हिंसाचार थांबवला, तर त्यांना देशाच्या सत्तेत वाटा देण्यात येईल, असा प्रस्तावही अफगाणिस्तानने पाठवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Kabul, Taliban