शेदाई कँप 31 डिसेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची सत्ता आल्यानंतर देशाचं चक्र उलट फिरताना दिसत आहे. लोकांना रोजच्या अन्नासाठी पोटच्या मुलींनाही विकावं लागत आहे. पश्चिम अफगाणिस्तानमधील दुष्काळ आणि युद्धामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या मोठ्या वस्तीत एक महिला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी लढत आहे. अजीज गुलच्या पतीने आपल्या 10 वर्षांच्या मुलीला न सांगता लग्नासाठी विकले जेणेकरून त्याच्या बदल्यात मिळालेल्या पैशातून तो आपल्या पाच मुलांचा उदरनिर्वाह करू शकेल. गुलच्या पतीने सांगितले की, ‘बाकीच्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना एकाचा त्याग करावा लागला.’ अफगाणिस्तानमध्ये निराधारांची संख्या वाढत आहे. गरीबीच्या खाईत चाललेले लोक असे अनेक निर्णय घेत आहेत जे देशाच्या दुर्दशेचे संकेत देत आहेत. अमेरिका आणि नाटो (NATO) सैन्याने माघार घेतल्यानंतर ऑगस्टच्या मध्यात तालिबानने सत्ता काबीज केली तेव्हा मदत आधारित अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डळमळीत होती. आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानची विदेशातील मालमत्ता जप्त केली आणि आर्थिक मदत रोखली. युद्ध, दुष्काळ आणि कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या देशासाठी त्याचे परिणाम विनाशकारी आहेत. कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. कुपोषण ही सर्वात चिंताजनक बाब असून मदत संस्था म्हणतात की अर्ध्याहून अधिक लोकसंख्या अन्न संकटाचा सामना करत आहेत. अफगाणिस्तानमधील ‘वर्ल्ड व्हिजन’ या मदत संस्थेचे राष्ट्रीय संचालक असुंथ चार्ल्स म्हणाले, ‘या देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, विशेषत: लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.’ चार्ल्सने पश्चिम हेरात शहराजवळ विस्थापित झालेल्या लोकांसाठी आरोग्य सेवा देत आहेत. ते म्हणाले, ‘आज मला हे पाहून खूप वाईट वाटते की अनेक कुटुंबांकडे खायला अन्न नाही. कुटुंबातील इतर सदस्यांचे पोट भरण्यासाठी ते आपली मुलेही विकण्यास तयार आहेत. येथे बालविवाह ही सामान्य गोष्ट आहे. वराचे कुटुंब डीलच्या बदल्यात मुलीच्या कुटुंबाला पैसे देते आणि मुलगी साधारणपणे 15 वर्षांची होईपर्यंत तिच्या पालकांसोबत राहते. अनेकजण आपल्या मुलांनाही विकण्याचा प्रयत्न करत आहेत. या पितृसत्ताक, पुरुषप्रधान समाजात गुल आपल्या मुलीच्या विक्रीला विरोध करत आहे. गुलने वयाच्या 15 व्या वर्षीच लग्न केले होते आणि आता आपल्या मुलीवर हा अन्याय होऊ नये असे तिला वाटते. गुलचे म्हणणे आहे की जर तिची मुलगी तिच्यापासून दूर नेली तर ती आत्महत्या करेल. गुलच्या पतीने सांगितले की, त्याने मुलीला विकलं आहे. त्यावर ती पतीला म्हणाली, की ‘हे करण्यापेक्षा मरण चांगलं होतं.’ या देशात मुलींचं अपहरण करुन बळजबरीने बांधले जाते स्कार्फ, म्हणजे झालं लग्न! तालिबान सरकारकडून सक्तीच्या विवाहावर बंदी गुलने तिचा भाऊ आणि गावातील ज्येष्ठ लोकांना एकत्र करत त्यांच्या मदतीने कांडीसाठी ‘घटस्फोट’ मिळवला आहे. यासाठी तिला तिच्या पतीने घेतलेले 100,000 अफगाणी (सुमारे 1,000 डॉलर) परत करावे लागणार आहे, जे तिच्याकडे नव्हते. घटनेपासून गुलचा पती फरार आहे. तालिबान सरकारने अलीकडेच जबरदस्तीच्या विवाहांवर बंदी घातली आहे. गुल म्हणाली, ‘मी खूप निराश आहे. कधी कधी असा विचार येतो की माझ्या मुलीला माझ्याकडे ठेवण्यासाठी या लोकांना पैसे देऊ शकले नाही तर मी आत्महत्या करेल, पण नंतर इतर मुलांबद्दल विचार मनात येतो. माझ्यानंतर याचं काय होईल? त्यांना कोण खायला घालणार?’ त्यांची मोठी मुलगी 12 वर्षांची, सर्वात धाकटी आणि सहावी मुलगी फक्त दोन महिन्यांची आहे. चार मुलांचा बापही आपली मुलगी विकतोय कारण… शिबिराच्या दुसर्या भागात, चार मुलांचा बाप असलेला हमीद अब्दुल्ला देखील आपल्या अल्पवयीन मुलींना लग्नासाठी विकत होता. कारण त्याच्याकडे त्याच्या आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसे नव्हते, जी लवकरच पाचव्या मुलाला जन्म देणार आहे. अब्दुल्ला यांनी सांगितले की, पत्नीच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज ते फेडू शकत नाहीत. तीन वर्षांपूर्वी त्याला त्याची मोठी मुलगी होशरन जी आता सात वर्षांची आहे, तिच्या लग्नाचे पैसे मिळाले आहेत. ज्या कुटुंबाने होशरनला विकत घेतलं आहे ते पूर्ण रक्कम देण्याआधी ती मोठी होण्याची वाट पाहत आहे. पण अब्दुल्लाला आता पैशांची गरज आहे, म्हणून तो त्याची दुसरी मुलगी, सहा वर्षांची नाझिया हिचे सुमारे 20,000–30,000 अफगाणी (200–300 डॉलर) मध्ये लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे. फ्रान्सची इस्लामी कट्टरतावादावर कारवाई, तिरस्कार पसरवणारी मशीद केली बंद अफगाणिस्तानात लाखो लोकांची उपासमार अब्दुल्ला यांच्या पत्नी बीबी जान म्हणाल्या की त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता पण हा एक कठीण निर्णय होता. ‘आम्ही जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा जणू माझ्या शरीराचा एक भाग कोणीतरी माझ्याकडून काढून घेतला होता.’ शेजारच्या बाडघिस प्रांतातील आणखी एक विस्थापित कुटुंब त्यांचा आठ वर्षांचा मुलगा सलाहुद्दीन विकण्याचा विचार करत आहे. त्याची आई, बुके (35) म्हणाली, ‘मला माझा मुलगा विकायचा नाही, पण मला ते करावं लागणार आहे. कोणतीही आई आपल्या मुलाशी असे करू शकत नाही. पण, जेव्हा तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो तेव्हा तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध निर्णय घ्यावा लागतो. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानातील लाखो लोक उपासमारीला सामोरे जात आहेत. पाच वर्षांखालील 32 लाख बालकांना तीव्र कुपोषणाचा सामना करावा लागत आहे. वर्ल्ड व्हिजनचे अफगाणिस्तानसाठी राष्ट्रीय संचालक चार्ल्स म्हणाले की मानवतावादी मदत निधीची नितांत गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.