मध्य आशियातील किरगिझस्तान (kyrgyzstan) हा देश आपल्या विचित्र आणि अत्यंत क्रूर प्रथेमुळे चर्चेत आहे. येथे मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केला जातो आणि नंतर जबरदस्तीने लग्नही केलं जाते. या लग्नानंतर मुली सेक्स स्लेव्ह आणि घर, शेतीत मजूर राबवल्या जातात. विचित्र गोष्ट म्हणजे मुलीच्या कुटुंबीयांना इच्छा असूनही पुन्हा अशा मुलीला स्वीकारले जात नाही.
थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनच्या (Thomson Reuters Foundation) अहवालानुसार या देशातील 5 पैकी 1 मुलीचे लग्नासाठी अपहरण केलं जाते. दररोज 30 पेक्षा जास्त विवाह होतात. म्हणजेच दर 40 मिनिटांनी एका मुलीचे अपहरण होते. या प्रथेचे नाव आहे अला कचू (ala kachuu) म्हणजे उचला आणि पळून जा. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या (United Nations Population Fund) अहवालात असे म्हटले आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये मुलीचं अपहरण करुन बलात्कार केला जातो. त्यानंतर नंतर लग्न केलं जातं. जेणेकरून तिचं कुटुंब तिला स्वीकारणार नाही.
वास्तविक किरगिझस्तानमध्ये 2013 मध्ये वधूंचे अपहरणावर आणि 2016 मध्ये बालविवाहावर बंदी घालण्यात आली आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अल्माझबेक अतांबायेव (Almazbek Atambayev) यांनी या गुन्ह्यासाठी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद केली होती. मात्र, तरीही दरवर्षी सुमारे 12,000 मुलींचे लग्नासाठी अपहरण केले जात आहे. अशी माहिती देशातील महिलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या वुमन्स सपोर्ट सेंटर (Women’s Support Centre) या संस्थेच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
मुले त्यांच्या पसंतीच्या अविवाहित मुलीला एकदा विचारतात. जर तिने नकार दिला तर जबरदस्तीने तिचे अपहरण करतात. मुलाचे संपूर्ण कुटुंबच मुलीवर घरात अत्याचार करतात. विरोध केला तर बलात्कार आणि मारहाण ही सामान्य बाब आहे. मुलीला पकडून तिच्या डोक्यावर पांढरा स्कार्फ जबरदस्तीने बांधला जातो, याचा अर्थ मुलीने लग्नास होकार दिला आहे.
लग्नासाठी अपहरण केलेल्या बहुतांश मुली अल्पवयीन असतात. त्यामुळेच बाळंतपणात मातांचा मृत्यू होणे या देशात सर्रास घडत आहे. जर आपण संपूर्ण मध्य आशियावर नजर टाकली तर किरगिझस्तानमध्ये मातामृत्यूचे (highest maternal mortality rate) प्रमाण सर्वाधिक आहे. आई जगली तरी मुलाची तब्येत बिघडते. कमी वजनाची मुलं असणं किंवा कुठलातरी आनुवंशिक आजार असणं इथे पाहायला मिळत आहे. याचे कारण मातांचे कोवळे वय आणि अत्यंत तणावाखाली जगणे हे मानले जाते.
वधूची निवड करून जबरदस्तीने तिला लग्न करण्यास भाग पाडणे. तिला मजूर म्हणून काम करायला लावणे, हे या देशात इतकं सामान्य आहे की, किरगिझस्तान संसदेच्या सर्वात तरुण महिला खासदार आयदा कास्यमालिवा (Aida Kasymalieva) यांनी संसदेत वधूच्या अपहरणाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा अनेक सदस्यांनी सभात्याग केला. रॉयटर्समध्ये या घटनेचा उल्लेख आहे.