कीव, 13 एप्रिल : रशिया-युक्रेन युद्धाला जवळपास 50 दिवस झाले आहेत. परंतु, आतापर्यंत रशियन सैन्य राजधानी कीव ताब्यात घेण्यात अपयशी ठरलं आहे. दरम्यान, पूर्व युक्रेनवर जोरदार हल्ल्यासाठी रशिया मोठ्या प्रमाणावर तयारी करत आहे. युद्धाच्या काळात आता फिनलंड आणि रशियामध्ये संघर्षाचा धोका वाढला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, फिनलंडने नुकतंच नाटोमध्ये स्वारस्य दाखवलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या पुतिन यांनी सशस्त्र रशियन सैन्याला फिनिश सीमेकडे पाठवलं.
येथे, रशियाने दावा केला आहे की युक्रेनच्या 36 व्या मरीन ब्रिगेडच्या 1,026 नौसैनिकांनी 162 अधिकाऱ्यांसह मारियुपोलमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, युक्रेनसोबत यापुढे शांतता संवाद होऊ शकत नाही. कीवने मॉस्कोवर चर्चा मोडल्याचा आरोप केल्याने पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध आक्रमण सुरू ठेवण्याची शपथ घेतली आहे.
हे वाचा -
Russia Ukraine War | रशिया युक्रेन युद्धामुळे अमेरिकेचं जगातील स्थान बदलणार का? काय आहे चीनचा प्लॅन?
पुतीन यांच्या निकटवर्तीयाला अटक
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय व्हिक्टर मेदवेदचुक यांना युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी अटक केली आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही अटक केलेल्या मेदवेदचुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाचा हल्ला सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते मेदवेदचुक यांना युक्रेनमध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. परंतु, युद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच ते गायब झाले.
त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी रशियासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी रशियाला सांगितलंय की, जर तुम्हाला मेदवेदचुक सुरक्षित राहायला हवे असतील तर युक्रेनच्या कैद्यांची सुटका करा.
हे वाचा -
Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला तीव्र; शहराच्या शहरं उद्ध्वस्त
युक्रेनने रशियन सैन्याचं 300 वे हवाई लक्ष्य नष्ट केलं
युक्रेनच्या हवाई दलाने दावा केला आहे की, त्यांनी रशियन सैन्याचे 300 वे हवाई लक्ष्य नष्ट केले आहे. 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासूनची ही आकडेवारी आहे. हवाई दलानं सांगितलं की, त्यांनी रशियन सैन्याचं सुखोई एसयू-25 लष्करी विमान नष्ट केले.
चार देशांचे राष्ट्राध्यक्ष कीव दौऱ्यावर
रशियन हल्ल्याचा सामना करत असलेल्या युक्रेनला आता अनेक देश उघडपणे मदत करत आहेत. अलीकडेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कीवला भेट दिली. आता पोलंड, लिथुआनिया, लॅटव्हिया आणि एस्टोनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी कीवला भेट दिली आहे. असं मानलं जात आहे की, हे देश युक्रेनला मोठी लष्करी आणि राजकीय मदत देऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.