कीव 14 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine War) युद्धाचा आज ४९ वा दिवस आहे, परंतु अजूनही युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. दरम्यान, रशियाने मोठा दावा करत सांगितलं की युक्रेनच्या मारियुपोलमध्ये 1000 हून अधिक युक्रेनियन नौसैनिकांनी त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं आहे. रशियन सैन्याचा हा दावा रॉयटर्स न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी रशियाने मारियुपोल शहराला चारही बाजूंनी वेढा घातला होता. अनेक दिवस हे शहर नाकाबंदीत होतं. युक्रेननेही सांगितलं होतं की मारियुपोल शहराला रशियाने वेढा घातला आहे. मारियुपोल येथे एक बंदर आहे जिथे गेल्या एक महिन्यापासून अनेक परदेशी जहाजे अडकून पडली आहेत. आता रशियाच्या दाव्याचा त्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी सांगितलं की युक्रेनच्या 36 व्या मरीन ब्रिगेडच्या किमान 1026 नौसैनिकांनी मारियुपोल मेटल प्लांटमध्ये रशियासमोर आत्मसमर्पण केलं आहे. कोनाशेन्कोव्ह यांनी दावा केला की या युक्रेनियन सैनिकांमध्ये 162 अधिकारी आणि 47 महिलांचा समावेश आहे. Russia Ukraine युद्धात मारियुपोल उद्ध्वस्त, सर्वत्र पडलेले मृतदेह, पहा भयानक दृश्य ते म्हणाले, यातील १५१ सैनिक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रशियाच्या दाव्यावर युक्रेनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु एक दिवस अगोदर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी ट्विट केलं की, “36 वी मरीन ब्रिगेड युद्धाभ्यासामुळे शहरातील अझोव्ह रेजिमेंटसह सैन्यात सामील होण्यात यशस्वी झाली. अरिस्टोविचने युक्रेनियन भाषेत हे ट्विट केलं, ज्याचा अंदाजे अर्थ असा होता की आपण हार मानू नका, सैन्याला माहिती आहे की ते काय करत आहेत. अलीकडेच रशिया आणि युक्रेन यांच्यात तुर्कस्तानमध्ये शांतता चर्चा झाली, त्यानंतर काही आशा निर्माण झाल्या. रशियानेही कीवच्या आसपासची लष्करी मोहीम कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु काही दिवसांनंतर रशियाचा हल्ला तीव्र झाला. यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अनेक विधानांमुळे युद्ध लगेच संपण्याची शक्यता आहे, असं वाटत नव्हतं. Russia Ukraine War : युद्धाचा विस्तार वाढला, पूर्व युक्रेनसह आता फिनलंडवरही पुतीनची वक्रदृष्टी? रशियाविरुद्धचं युद्ध चिकाटीने आणि निर्धाराने लढल्याबद्दल पाश्चात्य माध्यमांकडून आतापर्यंत युक्रेनच्या लष्कराचं कौतुक केलं जात होतं. परंतु पहिल्यांदाच रशियाचा हा मोठा दावा युक्रेनचं मनोधैर्य खचवू शकतो, असं जाणवत आहे. रशियाचा दावा खरा ठरल्यास युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर हे मोठं आव्हान ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.