नवी दिल्ली, 20 मार्च : रात्रंदिवस भारताचा तिरस्कार करणारे पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) हे अचानक भारताचे सर्वात मोठे चाहते झाले आहेत. आज (रविवारी) एका जाहीर सभेत त्यांनी भारताचे खुलेपणाने कौतुक केले आणि सलामही केला. इम्रान खान यांची ही बदललेली स्टाईल पाहून सगळेच (India-Pakistan) आश्चर्यचकीत झाले.
भारताचं तोंड भरून कौतुक
वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रविवारी खैबर पख्तूनख्वामधील मलाकंद जिल्ह्यात एका मोठ्या जनसभेला संबोधित करत होते. या जाहीर सभेत इम्रान खान यांनी भारताचे वेगवेगळ्या मुद्यांवरून कौतुक करत भारताचा परदेश हा आपल्याच लोकांसाठी असल्याचे सांगितले.
अमेरिका-रशियाशी समान संबंध
रॅलीत इम्रान खान म्हणाले, 'मी आज भारताला सलाम करतो. त्यांनी नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण पाळलं आहे. आज भारताची अमेरिकेशी क्वाडमध्ये आघाडी आहे आणि निर्बंध लागू असताना ते रशियाकडून तेलही विकत घेत आहेत. कारण भारताचे धोरण आपल्या लोकांसाठी आहे.
I salute India for pursuing an independent foreign policy always, today India is an ally of USA and Russia at the same time: PM Imran Khan pic.twitter.com/hJZcfMQRan
— Murtaza Ali Shah (@MurtazaViews) March 20, 2022
युरोपियन युनियन भारताला काही बोलत नाही
युक्रेनच्या संकटावरून युरोपीय संघाने पाकिस्तानला दबावाखाली घेतल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, युरोपियन युनियनचे राजनैतिक अधिकारी पाकिस्तानला जे काही बोलतात, तेच भारताला सांगण्यास घाबरतात. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यावर त्यांनी पाकिस्तानवर रशियावर टीका करण्यासाठी दबाव आणला, पण भारताला काहीही बोलण्याचे टाळले.
हे वाचा - जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर, PM मोदींनी दिलं 'हे' खास मौल्यवान Gift
असंतुष्ट खासदारांना परतण्याची ऑफर
या जाहीर सभेत इम्रान खान यांनी आपल्या बंडखोर खासदारांना पक्षात परतण्याची आणि अविश्वास प्रस्तावावर सरकारला पाठिंबा देण्याची ऑफर दिली. पक्षातील असंतुष्ट खासदारांनी ही संधी सोडली तर चोरांच्या बाजूने मतदान करून खासदारांनी आपली सद्सद्विवेक बुद्धी विकली आहे, हे संपूर्ण देशाला समजेल, असेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या जनतेने निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे इम्रान म्हणाले. पाकिस्तानसाठी ज्या पक्षाने काम केले आहे, त्याला दरगईचे तरुण पाठिंबा देतील. इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दिला आहे. ज्यावर 27 मार्च रोजी मतदान होऊ शकते. अविश्वासाचा ठराव पास झाल्यास त्यांची खुर्ची जाऊ शकते.
हे वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडलं त्याला पाकिस्तान-प्रेरित दहशतवाद जबाबदार - आझाद
भारताविरुद्ध अपप्रचार करून थकले
इम्रान खान जेव्हापासून पाकिस्तानात सत्तेवर आले आहेत, तेव्हापासून त्यांनी सर्वत्र भारताविरुद्ध अपप्रचाराची मोहीम सुरू केली. त्यांनी काश्मीरचा मुद्दा यूएन, ओआयसीपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. मात्र, भारताच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना कुठूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे इम्रान सतत निराश झाले आहेत. अशा परिस्थितीत शत्रू देश भारताची स्तुती त्यांच्या तोंडून ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pak pm Imran Khan, Pakisatan