नवी दिल्ली, 20 मार्च : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्यांना एक खास भेटवस्तू दिली आहे. शनिवारी भारत दौऱ्यासाठी पोहोचलेल्या जपानच्या पंतप्रधानांना मोदींनी ‘कृष्ण पंखी’ भेटवस्तू म्हणून दिलं आहे. ही भेटवस्तू अतिशय खास आहे. ही वस्तू चंदनाच्या लाकडापासून बनलेली असून याच्या कडांवर भगवान श्रीकृष्णाच्या विविध मुद्रा दर्शवणाऱ्या कलात्मक आकृत्या आहेत. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कृष्ण पंखी’ भेटवस्तू ही पारंपरिक साधनांचा वापर करुन कोरली गेली आहे. याच्या वरच्या भागावर टोकाला हाताने कोरलेली मोराची आकृती आहे, जो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. ‘कृष्ण पंखी’ ही खास भेटवस्तू राजस्थानमधील चुरू येथील कुशल कारागिरांनी हाताने कलाकुसर करुन तयार केली आहे. ‘कृष्ण पंखी’ ही कलाकृती शुद्ध चंदनाच्या लाकडापासून बनलेली आहे. चंदन प्रामुख्याने भारतातील दक्षिण भागातील जंगलांत आढळतं. शनिवारी दुपारी 3.40 ला फुमियो किशिदा उच्चस्तरीय शिष्टमंडळासह भारतात पोहोचले. जपान सरकारचे प्रमुख म्हणून त्यांच्या हा पहिलाच भारत दौरा आहे. याबाबत पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने ट्विटही केलं आहे.
Advancing friendship with Japan.
— PMO India (@PMOIndia) March 19, 2022
Prime Ministers @narendramodi and @kishida230 held productive talks in New Delhi. Both leaders discussed ways to boost economic and cultural linkages between the two countries. pic.twitter.com/GYhHjlarKY
पंतप्रधान मोदी आणि किशिदा यांच्यात दिल्लीत चर्चा झाली. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठीच्या उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
हे वाचा - पुढील 5 वर्षांत जपान भारतात 42 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार : द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी दिली माहिती
दरम्यान, जपान येत्या पाच वर्षात भारतात 42 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister Fumio Kishida) यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. भारत आणि जपान (India Japan Relations) यांच्यात दरवर्षी ही शिखर परिषद आयोजित केली जाते. दोन्ही देशांमध्ये एकूण सहा करार झाले आहेत. भारत आणि जपान यांच्यातील ही द्विपक्षीय बैठक अशा वेळी झाली आहे, जेव्हा युक्रेन संकटाबाबत जगभरात सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. किशिदा एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह भारतात आले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले आहेत.