संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधांचं उल्लंघन; उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनकडून विध्वंसक क्षेपणास्त्रांची निर्मिती

संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधांचं उल्लंघन; उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनकडून विध्वंसक क्षेपणास्त्रांची निर्मिती

उत्तर कोरियाने (North Korea) आण्विक शस्त्रे (Nuclear Missiles) आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या (Ballistic Missile) आधुनिकीकरणाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देत आहे. याचा खुलासा संयुक्त राष्ट्राच्या एका समितीने केला आहे.

  • Share this:

न्युयॉर्क, 09 फेब्रुवारी: उत्तर कोरियाने (North Korea) संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) निर्बंधाना धाब्यावर बसवून आण्विक शस्त्रे (Nuclear Missiles) आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचं (Ballistic Missile) आधुनिकीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि त्यासाठी आवश्यक असणारी सामग्री आणि तंत्रज्ञान इतर देशांकडून मिळवण्याचा प्रयत्न उत्तर कोरिया करीत आहे, असा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधांवर लक्ष ठेवणाऱ्या एका तज्ज्ञ समितीने केला आहे. सोमवारी सुरक्षा परिषदेला सादर केलेल्या अहवालात तज्ज्ञ समितीने म्हटलं की, उत्तर कोरियातील किम जोंग उनच्या (Kim Jong Un) सरकारने अण्वस्त्रे बनवणारी सामग्री देखील तयार केली आहे.

तज्ज्ञांनी पुढे सांगितलं की, "उत्तर कोरियाने सैन्य परेडमध्ये कमी पल्ल्याची आणि मध्यम पल्ल्याची काही नवीन क्षेपणास्त्रे, पाणबुडीतून हल्ला करता येतील अशी आणि आंतरमहाद्वीपीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन केलं आहे." अहवालात असंही म्हटलं आहे की, "उत्तर कोरियाने नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. त्याचबरोबर सामरिक आण्विक शस्त्रे विकसित करण्याची घोषणाही केली आहे. शिवाय देशात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उभारणीच्या पायाभूत सुविधांचं नूतनीकरणही केलं आहे."

हे ही वाचा-लॉकडाऊनचा असा उपयोग! प्रियकराला प्रोबेशनवर ठेवलं; आता 11 महिन्यांनंतर निर्णय

उत्तर कोरियाने 2006 मध्ये पहिल्यांदा अणुचाचणी केली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर कडक निर्बंध लादले होते. उत्तर कोरियाकडून अणुचाचणी आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे उत्पादन रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राने अनेक देशांच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते. शिवाय उत्तर कोरियाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात बंदी घालण्यासाठी त्या देशाची चहुबाजूंनी नाकाबंदी केली होती.

असोसिएटेड प्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार, संबंधित अहवालात उत्तर कोरिया आपला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र योजना तयार करीत आहे, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधाकडे दुर्लक्ष करून आंतरराष्ट्रीय बँकांचा गैरवापर आणि बेकायदेशीरपणे तेल आयात करीत असल्याचा आरोपही या अहवालात करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सायबर गुन्ह्यांना प्रोत्साहन देण्याचा आरोपही या अहवालात करण्यात आला आहे.

Published by: News18 Desk
First published: February 9, 2021, 9:31 PM IST

ताज्या बातम्या