वॉशिंग्टन, 20 नोव्हेंबर : अमेरिकेचे नव-निर्वाचित राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden birthday) यांनी शुक्रवारी त्यांचा 78वा वाढदिवस साजरा केला. ते देशातील इतक्या वयाचे पहिलेच राष्ट्रपती असतील. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणूकांदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या विरोधी नेत्याला त्यांच्या वयामुळे 'स्लीपी जो' असं म्हटलं होतं. वयाच्या या टप्प्यातील नेत्याच्या हातात देश सोपवणं योग्य नसल्याचीही चर्चा होती. परंतु तरीही जो बायडन यांनी राष्ट्रपती पदावर आपल्या नावाची मोहोर उमटवली. जो बायडन यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी चर्चेत आहेत.
बायडन यांना शाळेत असताना, बोलण्यात अडथळे येण्याची समस्या होती. बायडन यांचा लहानपणीचा मित्र जिम कॅनेडीने असोसिएटेड प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांना बोलण्यात समस्या असल्यामुळे शाळेत बी-बी ब्लॅकबोर्ड असं चिडवलं जायचं. पण त्यांनी इतरांकडे लक्ष न देता चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला आणि अखेर यशस्वी ते झाले.
(वाचा - अमेरिका: जो बायडेन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पहिलाच मोठा धक्का, चीनला कडक इशारा)
जो बायडन ज्यावेळी नीलिया हंटर यांना पहिल्यांदा भेटले त्यावेळी, त्यांच्याकडे कमाईचा कोणताही सोर्स नव्हता. एका रेस्टॉरेंटमध्ये डेटसाठी गेल्यावर त्यांच्याकडे बिल भरण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी नीलिया यांनी बिल भरलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी नीलिया आणि बायडन यांचं लग्न झालं. परंतु 1972 मध्ये नीलिया आणि त्यांची एक वर्षांची मुलगी नाओमी यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला. त्या परिस्थितीत नेहमी आत्महत्या करण्याचे विचार येत असल्याचं बायडन यांनी सांगितलं.
बायडन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, माझ्याकडे करियरचा दुसरा कोणता पर्याय असता, तर मी आर्किटेक्ट झालो असतो. बायडन यांना फुटबॉल आणि सॉकर खेळण्याचीही आवड आहे. बायडन यांनी Promises to Keep हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक चढ-उतारांचा उल्लेख केला आहे. आपल्या आईमुळे कठिणातील कठिण ते नाजूक कामांपर्यंत सर्व कामं जमू लागती. वडिलांचं रोज सकाळी लवकर उठून, एकही सुट्टी न घेता कामावर जाणं या गोष्टी मला नेहमी प्रेरित करत राहिल्या, अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.