म्यानमार सत्तापालट; सलग दुसऱ्या दिवशी इंटरनेट सेवा बंद असल्याने नागरिक रस्त्यावर

म्यानमार सत्तापालट; सलग दुसऱ्या दिवशी इंटरनेट सेवा बंद असल्याने नागरिक रस्त्यावर

सत्तापालटाच्या या अनपेक्षित आणि अचानक घडलेल्या घटनेनंतर हजारो नागरिक आंदोलन करत आहेत. याचदरम्यान लष्कराने देशातील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

  • Share this:

म्यानमार, 17 फेब्रुवारी : म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार लष्कराने उलथवून टाकत सत्ता ताब्यात (Myanmar Military Takeover) घेतली आणि काही राजकीय नेत्यांना अटक केली. सत्तापालटाच्या या अनपेक्षित आणि अचानक घडलेल्या घटनेनंतर हजारो नागरिक आंदोलन करत आहेत. याचदरम्यान लष्कराने देशातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंटरनेटवर बंदी कायम ठेवली आहे. म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यंगूनमध्ये दुसऱ्या दिवशी इंटरनेट ब्लॅकआउट असल्यामुळे मंगळवारी मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले. आंदोलनाकांना रोखण्यासाठी लष्कराने जवानांना तैनात केलं आहे.

सोमवारी म्यानमारमधील जनता लष्कराविरोधात रस्त्यावर उतरली होती. रविवारी रात्री लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी देशातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा आणि सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. म्यानमारमधील दुसरं सर्वात मोठं शहर मंडाले येथे इंजिनिअरिंगच्या हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन मोर्चा काढला. या विद्यार्थ्यांनी हातामध्ये 'आमच्या नेत्यांना सोडा, न्यायासोबत कोण उभे आहे?' आणि 'अर्ध्या रात्री लोकांना बेकायदेशीरपणे अटक करणं थांबवा' या आशयाचे पोस्टर पकडले होते आणि जोरदार घोषणाबाजी केली.

(वाचा - अरे देवा! कर्ज फेडलं नाही म्हणून Underwear सुद्धा सोडली नाही; चक्क लिलावात काढली)

नेपीता, मायित्किना आणि सिटवे या ठिकाणी देखील आंदोलन सुरू असून जवानांना तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान, लष्कराने अटक केलेल्या म्यानमारच्या नेत्या आँग सान सू की यांच्या कोठडीमध्ये वाढ केली आहे. आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी म्हणजे आँग सान सू यांची सुटका करा. वकील खिन माँग जॉ यांनी कोर्टाबाहेर पत्रकारांशी संवाद साधत आँग सान सू यांच्या कोठडीत 17 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली असल्याचं सांगितलं. सू यांच्या पार्टीने जॉ यांना न्यायालयात त्यांचं प्रतिनिधित्व करण्यास सांगितलं. सोमवारी सू यांच्या कोठडीची मुदत संपत होती. त्यांच्यावर बेकायदेशीरपणे वॉकी टॉकी बाळगल्याचा आरोप लावण्यात आलाय. सू यांच्या कोठडीत आणखी वाढ झाल्यास लष्कर आणि आंदोलकांमधील तणाव आणखी वाढू शकतो.

(वाचा - 'जगाला वाचवण्यासाठी बलिदान द्यावं लागेल'; असं म्हणत महिलेने केली मुलाची हत्या)

लष्कराने सत्ता स्थापन केल्यानंतर आँग सान सू यांच्यासह 400 हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आली. प्रत्येक दिवशी अटक करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये वाढ होत आहे. 'आम्ही निवडून दिलेल्या सरकारला लष्कराने सत्ता परत करावी', अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीला लष्कराने सत्ता उलथवून टाकत देशाचं संपूर्ण नियंत्रण आपल्या हाती घेतलं आणि आँग सान सू यांच्यासह अनेकांना अटक केली. त्याचसोबत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना एकत्रितपणे संसदेच्या नव्या अधिवेशनात सहभागी होण्यास मनाई केली.

Published by: Karishma Bhurke
First published: February 17, 2021, 7:03 PM IST

ताज्या बातम्या