नवी दिल्ली, 23 एप्रिल : युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जगभरात कच्च्या तेलापासून ते धान्याच्या किमतींत मोठी वाढ झाली आहे. कारण युक्रेन हा धान्य आणि पोल्ट्री उत्पादनांचा मोठा निर्यातदार देश युद्धामुळे उद्ध्वस्त झाला आहे. तर, पाश्चात्य देशांनी हल्ला करणाऱ्या रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशिया धान्य, पेट्रोलियम उत्पादनांचा, विशेषतः तेल आणि वायूचा प्रमुख निर्यातदार आहे. जेव्हा रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं तेव्हा त्याच्या राजकीय आणि आर्थिक परिणामांबद्दल बरेच काही सांगितलं गेलं आहे. तर, आता यामुळे ग्लोबल वॉर्मिंगला तोंड देण्यासाठीचे उपाय खूप महागात पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण हरित अर्थव्यवस्थेसाठी (Green Economy) आवश्यक असलेल्या धातूंच्या किमती गगनाला भिडू शकतात.
जागतिक बाजारपेठेत, अलीकडच्या काळात अशा काही धातूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, ज्यांचा वापर हरित अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठी बॅटरी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो, यापैकी एक धातू निकेलची किंमत अवघ्या 24 तासांत दुप्पट झाली आहे. दुर्मीळ असलेले धातू (rare earth materials) आणि कोबाल्ट, निकेल, लिथियम, मॅंगनीज आणि ग्रॅफाइटसह सुमारे दीड डझन धातू हरित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असं मानलं जातं. या धातूंच्या किमती वाढण्याचं कारण म्हणजे, रशियावर लादण्यात आलेले निर्बंध असल्याचं मानलं जातं. यापैकी काही धातू रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर तयार होतात.
हे वाचा -
बॉम्बस्फोटाने पुन्हा हादरलं अफगाणिस्तान; लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू
इलेक्ट्रिक बॅटरी बनवण्यासाठी या धातूंची मागणी इतकी महत्त्वाची आहे की, संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेने अक्षय्य ऊर्जेसाठी आवश्यक खनिजं आणि धातूंच्या उत्पादनावर आणि प्रक्रियेवर राष्ट्रीय संरक्षण उत्पादन कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. येत्या काळात तेल आणि वायूच्या मागणीत घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जगातील नवनिर्माणक्षम ऊर्जेचा वापर वाढणं हे त्याचं सर्वात मोठं कारण असेल. जिथं हरित ऊर्जेच्या साधनांमध्ये वापरण्यासाठी आवश्यक खनिजं आणि धातू असतील, अशा देशांची स्थिती चांगली होईल. हरित ऊर्जेच्या युगातही, रशियाला कोणतंही नुकसान होण्याची अपेक्षा नाही, कारण तो जगातील तिसरा सर्वात मोठा निकेल पुरवठादार आहे. यासोबतच त्यांच्याकडे कोबाल्ट आणि प्लॅटिनमचाही मोठा साठा आहे.
हे वाचा -
Ukraine War: बुचानंतर आता मारियुपोलजवळ सापडली 9000 मृतदेहांची सामूहिक कबर
सध्या, चीन रेअर अर्थ मटेरियल्सचा सर्वात मोठा उत्पादक आहे. काँगो हा कोबाल्टचा सर्वात मोठा उत्पादक आहे. तर, चिली तांब्याचा, इंडोनेशिया निकेलचा आणि ऑस्ट्रेलिया हा लिथियमचा सर्वात मोठा उत्पादक आहे. आगामी काळात त्यांची किंमत खूप वेगाने वाढेल आणि ती कमी होण्याची शक्यता नाही. अशा प्रकारच्या धातू आणि खनिजांचे साठे असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये गुंतवणूक करून चीनने आधीच एक पाऊल पुढे टाकलं आहे. मात्र, वेळीच कोणतीही मोठी पावले उचलली गेली नाहीत, तर ग्लोबल वॉर्मिंगला तोंड देण्याचे उपाय अधिक महागडे होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.