काबूल, 16 ऑगस्ट : तालिबान्यांनी (Taliban) काबूलवर (Kabul) कब्जा मिळवला आहे. तालिबान काबूलवर ताबा मिळवण्यास सुरुवात करत असताना नागरिकांनी येथून पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे नागरिकांची देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर एकच झुंबड उडाली आहे. याचदरम्यान काबूल एयरपोर्टवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. काबूल विमानतळावरुन USAF’s च्या C-17A या वाहतूक विमानाने उड्डाण केलं. अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी, या देशातून कसंही बाहरे पडण्यासाठी तरुण थेट विमानाच्या इंजिनवरच बसले. हे तरुण इंजिनवर बसूनच लँडिंग गिअर पकडून होते. काबूलमधून कसंही बाहेर पडण्यासाठी त्यांची ही धडपड होती. परंतु विमानाने उड्डाण करताच लँडिंग गिअर पकडलेले अनेक अफगाणी लोक हवेतून खाली पडले असल्याचं समजतं आहे.
काबूल एअरपोर्टवर अंदाधुंद गोळीबाराचा LIVE VIDEO समोर; देश सोडण्याची धडपड सुरू असताना अमेरिकन सैन्याचा गोळीबार
अफगाणिस्तानातून पळ काढण्यासाठी, अनेकांची मोठी धडपड सुरू होती. यातच USAF’s च्या C-17A विमानाने उड्डाण केल्यानंतर या विमानाच्या इंजिनावर चढलेल्या लोकांचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
सध्या काबूल विमानतळावरील परिस्थिती गंभीर आहे. विमानतळावर देश सोडण्यासाठी हजारो नागरिक जमले आहेत. काबूलवर ताबा मिळवल्याने विमानांची उड्डाणेही रद्द झाली. त्यामुळे विमानतळावर हजारो लोकांची गर्दी झाली आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे देशाबाहेर पडण्यासाठी हवाईमार्ग हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.